चेन्नई : बेन स्टोक्स अनेक चेंडूवर स्विपचा फटका खेळून गोलंदाजांवर हल्ला चढवीत असल्याने आम्हाला योजना बदलावी लागली, अशी कबुली भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम याने शनिवारी दिली. दुसरा कसोटी सामना खेळत असलेल्या झारखंडच्या या गोलंदाजाने इंग्लंडविरुद्ध ४४ षटकात १६७ धावा मोजल्या. नदीम फलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकला नाही. तो म्हणाला, ‘मी ऑफ स्टम्पबाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र रुटने रिव्हर्स स्विपचे फटके खेळताच मला लाईन आणि लेंग्थमध्ये बदल करावा लागला. काही वेळानंतर पुन्हा यष्टीवर मारा करीत त्याला बाद केले.
नदीमने सहा ‘नो बॉल’ टाकले. याविषयी विचारताच तो म्हणाला, ‘मला तांत्रिक अडचणी आहेत. चेंडू सोडताना क्रीझवर जम्प घेतो. यात थोडा उशीर होत असल्याने समस्या उद्भवली आहे. पहिल्या दिवशी त्रास जाणवला, पण दुसऱ्या दिवशी कमी चुका झाल्या. नेटमध्ये अधिक सरावाद्वारे मी समस्येवर तोडगा काढणार आहे.’