चेन्नई : कर्णधार ज्यो रुटने (२१८) कारकिर्दीतील शंभराव्या कसोटीत झळकावलेल्या द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी आपली पकड मजबूत करताना पहिल्या डावात ८ बाद ५५५ धावांची मजल मारली.
रुटने ९ तास खेळपट्टीवर तळ ठोकत ३७७ चेंडूंना सामोरे जाताना ही खेळी केली. आपल्या शंभराव्या कसोटीत द्विशतक झळकावणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकी मारा कसा खेळायचा याचा त्याने अन्य क्रिकेटपटूंना वस्तुपाठ घालून दिला. पहिल्या दिवशी रुट आक्रमक भूमिकेत होता तर डोम सिब्ले संयमी फलंदाजी करीत होता तर दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्स आक्रमक भूमिका बजावत होता आणि रुट संयमी फलंदाजी करीत होता.स्टोक्सने ११८ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ८२ धावा केल्या. त्याने रुटसोबत १२४ धावांची भागीदारी केली. रुटने अश्विनच्या (२-१३२) गोलंदाजीवर षटकार ठोकत पाचवे द्विशतक पूर्ण केले. स्टोक्सनेही दुसऱ्या टोकावरून आकर्षक फटकेबाजी केली. ईशांत शर्माने (२-५२) सलग दोन चेंडूंवर जोस बटलर (३०) व जोफ्रा आर्चर (०) यांना बाद केले. ईशांत, अश्विन, बुमराह व शाहबाज नदीम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदर मात्र महागडा ठरला. दरम्यान, अश्विनने स्टोक्सला स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद करण्याची संधी गमावली.
रूटचा शंभराव्या कसोटीत द्विशतकाचा विश्वविक्रम
भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने अनेक विक्रमांना गवसणी घातली असून, शंभराव्या सामन्यात द्विशतकाची नोंद करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. ३० वर्षांच्या रुटने शनिवारी दुसऱ्या सत्रात ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर लॉगऑनला षटकार ठोकून २०० धावा पूर्ण केल्या व इंझमामला मागे टाकले. आयसीसीने त्याचे अभिनंदन करीत लिहिले,‘शंभराव्या सामन्यात द्विशतक ठोकणाऱ्या ज्यो रुटचे अभिनंदन.’ शंभराव्या कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम याआधी पाकिस्तानचा फलंदाज इंझमाम उल हकच्या नावावर होता. इंझमामने आपल्या शंभराव्या कसोटी सामन्यात २००५ ला बेंगळुरू येथे १८४ धावा केल्या होत्या. रुटने इंझमामचा हा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. ३७७ चेंडूत २१८ धावा काढणाऱ्या रुटला अखेर शाहबाज नदीम याने पायचित केले.
पाचवी द्विशतकी खेळी
रूटची ही पाचवी द्विशतकी खेळी ठरली. त्याने सहकारी ॲलिस्टर कुक, राहुल द्रविड, ग्रॅमी स्मिथ या द्विशतकी खेळी करणाऱ्या दिग्गजांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
तिसरे दीड शतक
कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रुट आता सातव्या स्थानावर आहे. या यादीत संगकारा पहिल्या स्थानावर आहे. त्याने २००७ मध्ये सलग चारवेळा १५० हून अधिक धावा केल्या. दुसऱ्या क्रमांकावर हॅमन्ड असून, त्यांनी १९२८-२९ मध्ये तीनवेळा अशी कामगिरी केली. ब्रॅडमन (१९३७), जहीर अब्बास (१९८२-८३) तर टॉम लॅथम (२०१८-१९) यांनी प्रत्येकी तीनवेळा अशी कामगिरी केली आहे.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव :-
रोरी बर्न्स झे. पंत गो. अश्विन ३३, डोमिनिक सिब्ले पायचित गो. बुमराह ८७, डेनियल लॉरेन्स पायचित गो. बुमराह ००, ज्यो रुट पायचित गो. नदीम
२१८, बेन स्टोक्स झे. पुजारा गो. नदीम ८२, ओली पोप पायचित
गो. अश्विन ३४, जोस बटलर त्रि. गो. ईशांत
३०, डॉम बेस खेळत
आहे २८, जोफ्रा आर्चर
त्रि. गो. ईशांत ००, जॅक लीच खेळत आहे ०६. अवांतर (३७). एकूण १८० षटकांत ८ बाद १५५.
बाद क्रम : १-६३, २-६३, ३-२६३, ४-३८७, ५-४७३, ६-४७७, ७-५२५, ८-५२५.
गोलंदाजी :
ईशांत २७-७-५२-२, बुमराह ३१-४-८१-२, अश्विन ५०-५-१३२-२, नदीम ४४-४-१६७-२, सुंदर २६-२-९८-०,
रोहित शर्मा २-०-७-०.