चेन्नई : जॅक लीचचा फिरकी मारा व जगातील सर्वाधिक यशस्वी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची भेदक गोलंदाजी याच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी मंगळवारी भारताचा २२७ धावांनी पराभव केला आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयासह इंग्लंडने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या विश्व टेस्ट चॅम्पियनशिप तालिकेत अव्वल स्थान पटकावले. या सामन्यापूर्वी इंग्लंड चौथ्या स्थानी होता. या सामन्याच्या निकालामुळे भारताची चौथ्या स्थानी घसरण झाली. इंग्लंडचा हा भारतात सर्वांत मोठा विजय ठरला.
लीच (४-७६) व अँडरसन (३-१७) यांच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघाचा दुसरा डाव ४२० धावांच्या विश्वविक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहली व शुभमन गिल (५०) यांच्या अर्धशतकानंतरही ५८.१ षटकांत १९२ धावांत संपुष्टात आला. सकाळच्या सत्रात इंग्लंडच्या विजयाची पायाभरणी अँडरसनने केली. त्यात भारताने १०५ धावांच्या मोबदल्यात ५ गडी गमावले. अँडरसनने पहिल्या सत्रात गिल, अजिंक्य रहाणे (००) व ऋषभ पंत (११) यांना तंबूचा मार्ग दाखवत भारताची मधली फळी गारद केली.  यापूर्वी भारतात कसोटी मालिका विजय साकारणारा इंग्लंड शेवटचा संघ होता आणि या संघानेही या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. इंग्लंडने २०१२-१३ मध्ये भारताला भारतात २-१ ने पराभूत केले होते. दुसरा कसोटी सामना याच एमए चिदंबरम स्टेडियममध्ये १३ फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे.
भारत दुसरा डाव : रोहित शर्मा त्रि. गो. लीच १२, शुभमन गिल त्रि.गो. अँडरसन ५०, चेतेश्वर पुजारा झे. स्टोक्स गो. लीच १५, विराट कोहली त्रि. गो. स्टोक्स ७२, अजिंक्य रहाणे त्रि. गो. अँडरसन ००, ऋषभ पंत झे. रुट गो. अँडरसन ११, वॉशिंग्टन सुंदर झे. बटलर गो. बेस ००, रविचंद्रन अश्विन झे. बटलर गो. लीच ०९, शाहबाज नदीम झे. बर्न्स गो. लीच ००, ईशांत शर्मा नाबाद ०५, जसप्रीत बुमराह झे. बटलर गो. आर्चर ०४. अवांतर (४). एकूण ५८.१ षटकांत सर्व बाद १९२. 
बाद क्रम : १-२५, २-५८, ३-९२, ४-९२, ५-११०, ६-११७, ७-१७१, ८-१७९, ९-१७९, १०-१९२. 
गोलंदाजी : आर्चर ९.१-४-२३-१, लीच २६-४-७६-४, अँडरसन ११-४-१७-३, बेस ८-०-५०-१, स्टोक्स ४-१-१३-१.
आमच्या देहबोलीत विजयाची भूक नव्हती : कोहली
चेन्नई : ‘चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत २२७ धावांनी झालेल्या पराभवास कुठलाही बहाणा देता येणार नाही. पहिल्या दिवसापासून आमची देहबोली आणि आक्रमकता विजयी स्तराची नव्हती,’ अशी कबुली कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी दिली आहे.
आमच्या तुलनेत अधिक व्यावसायिक आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या इंग्लंडला विजयाचे श्रेय द्यायलाच हवे, असे सांगून विराट म्हणाला, ‘भारतीय संघात विजयासाठी जी देहबोली आणि भूक असायला हवी, ती नव्हती. पहिल्या डावात तळाच्या स्थानावरील फलंदाजांमुळे आणि दुसऱ्या डावात आम्ही चांगल्या स्थितीत होतो. काय गोष्टी करायला हव्या होत्या, त्या समजून घेणे गरजेचे आहे. सांघिकदृष्ट्या आम्ही नेहमी सुधारणेवर भर देत राहणार आहोत. इंग्लंड संघ या सामन्यात आमच्यापेक्षा अधिक व्यावसायिकपणे खेळला.’