कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघानं ७ गडी अन् ४३ चेंडू राखून दक्यात विजय मिळवला आहे. टॉस गमावल्यावर पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडच्या संघाने निर्धारित २० षटकात सर्व बाद १३२ धावा करत टीम इंडियासमोर १३३ धावांचे टार्गेट सेट केले होते. सलामीवीर अभिषेक शर्मानं केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने हा आव्हान सहज पार केले. या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बटलर वगळता इंग्लंडच्या एकाही बॅटरला मैदानात धरता आला नाही तग
ईडन गार्डन्सच्या मैदानात नाणेफे जिंकून भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अर्शदीप सिंग याने संघाला कमालीची सुरुवात करून देत पाहुण्या संघाला धक्क्यावर धक्के दिले. त्यानंतर वरुण चक्रवर्तीनं पार्टी जॉईन केली. त्याने एकाच षटकात दोन विकेट्स घेत इंग्लंडला आणखी बॅकफूटवर ढकलले. या दोघांशिवाय उप कर्णधार अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या संघाकडून जोस बटलर ४४ चेंडूत केलेल्या ६८ धावा वगळता अन्य कुणालाही लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. इंग्लंडच्या संघाने निर्धारित २० षटकात सर्व बाद १३२ धावा केल्या होत्या.
अभिषेक शर्माची धमाकेदार बॅटिंग, टीम इंडियाने १३ व्या षटकातच जिंकला सामना
इंग्लंडच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीनं भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर ४१ धावा असताना संजू सॅमसनच्या रुपात जोफ्रा आर्चरनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. त्याने २० चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावा केल्या. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादवला जोफ्रा आर्चरनं खातेही उघडू दिले नाही. त्यानंतर अभिषेक शर्मानं तोऱ्यात बॅटिंग केली. त्याने ३४ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकाराच्या मदतीने २३२.३५ च्या स्ट्राइक रेटनं ७९ धावा कुटल्या. त्याने पाहुण्या संघातील गोलंदाजांची केलेल्या धुलाईच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडनं दिलेले आव्हान १३ व्या षटकातील ५ व्या चेंडूवरच पार केले. तिलक वर्मानं १६ चेंडूत नाबाद १९ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला हार्दिक पांड्या ४ चेंडूत ३ धावा करून नाबाद राहिला.
Web Title: India vs England 1st T20I Abhishek Sharma Fifty After Varun Chakravarthy Arshdeep Singh Show India won by 7 wkts
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.