IND vs ENG, 1st ODI: Yashasvi Jaiswal Incredible Efforts And Brilliant Catch : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या नागपूरच्या मैदानात रंगला आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या पाहुण्या इंग्लंड संघाच्या सलामीवीरांनी धमाक्यात सुरुवात करत आपल्या कॅप्टनचा निर्णय सार्थ ठरवला. फिलिप सॉल्ट आणि बेन डकेट या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ७५ धावांची दमदार भागीदारी केली. भारतीय गोलंदाजी इंग्लंडच्या सलामीवीरांसमोर हतबल ठरतीये असं वाटत असताना या जोडीतील ताळमेळ ढासळला अन् फिलिप सॉल्टच्या रुपात इंग्लंडला रन आउटच्या रुपात पहिला धक्का बसला. त्याने २६ चेंडूत ४३ धावांची खेळी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पदार्पणाचा वनडे सामना खेळणाऱ्या जोडीनं मिळून दिला इंग्लंडला धक्का
पहिलं यश मिळाल्यावर टीम इंडियाला दुसऱ्या विकेटसाठी फार प्रतिक्षा करावी लागली नाही. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या हर्षित राणानं बेन डकेटच्या रुपात वनडेतील आपली पहिली विकेट घेतली. त्याला पदार्पणातील पहिली विकेट मिळवून देण्यात यशस्वी जैस्वालनं हातभार लावला. कमालीचा योगायोग म्हणजे यशस्वी जैस्वालही याच सामन्यातून वनडेत पदार्पण केले आहे. त्याने जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा पेश करत वनडेतील आपला पहिला बेस्ट कॅच घेतला. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या या जोडीनं मिळून इंग्लंडला दुसरा धक्का दिला.
यशस्वी जैस्वालनं पुन्हा एकदा दाखवला क्षेत्ररक्षणातील सर्वोत्तम दर्जा
इंग्लंडच्या डावातील १० व्या षटकात हर्षित राणाच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बेन डेकट याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटच्या दिशेनं चेंडू अगदी उंच हवेत उडाला. यशस्वी जैस्वालनं मागे धावत शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवत अप्रतिम झेल टिपत बेन डकेटला तंबूचा रस्ता दाखवला. कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालनं आपल्या फिल्डिंगचा सर्वोत्तम दर्जा दाखवून दिला आहे. अनेक प्रतिम कॅचसह त्याने लक्षवेधून घेतले होते. आता वनडेतही त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम दर्जा दाखवून दिला आहे.
आधी सॉल्टसोबत गडबडला, अन् काही वेळातच बेन डकेटनही तंबूत परतला
इंग्लंडचा बॅटर बेन डकेट याने पहिल्या विकेटसाठी सॉल्टच्या साथीनं ७५ धावांची दमदार भागीदारी केली होती. ताळमेळाच्या अभावामुळे ही जोडी फुटल्यावर बेन डकेट टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकला असता. पण हर्षित राणाची अचूक गोलंदाजी अन् यशस्वीचा अप्रतिम झेल यामुळे त्याचा खेळ २९ चेंडूत ३२ धावांवरच खल्लास झाला. त्याने आपल्या या खेळीत ६ खणखणीत चौकार मारले.
Web Title: India vs England 1st ODI Debut Best Moments Yashasvi Jaiswal Incredible Efforts And Brilliant Catch First ODI Wicket For Harshit Rana Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.