India vs County XI : इंग्लंड दौऱ्याची पूर्वतयारी म्हणून खेळवण्यात आलेल्या पहिल्या सराव सामन्यात भारतीय फलंदाज व गोलंदाज यांची कामगिरी समाधानकारक झाली. भारतानं पहिल्या डावात 311 आणि दुसऱ्या डावात 3 बाद 192 ( डाव घोषित) धावा केल्या, प्रत्युत्तरात कौंटी एकादश संघाला पहिल्या डावात 220 व दुसऱ्या डावात बिनबाद 31 धावा करता आल्या. भारत विरुद्ध कौंटी एकादश संघातील पहिला सराव सामना अनिर्णीत राहिला. लोकेश राहुलनं पहिल्या डावात नाबाद शतक झळकावलं, तर रवींद्र जडेजानं दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी केली. उमेश यादव व मोहम्मद सिराज यांनी छाप सोडली.
भारताच्या पहिल्या डावातील 311 धावांच्या प्रत्युत्तरात कौंटी एकादशनं हसीब हमीदच्या 112 धावांच्या जोरावर 220 धावा केल्या. भारतानं दुसऱ्या डावात मयांक अग्रवाल व चेतेश्वर पुजारा यांना सलामीला पाठवले अन् दोघांनी 87 धावांची सलामी दिली. जॅक कार्लसननं टीम इंडियाला पहिला धक्का देताना मयांकला 47 धावांवर बाद केले. वॉशिंग्टननं हा झेल टिपला. त्यानंतर कार्लसननं 38 धावांवर चेतेश्वर पुजारालाही माघारी पाठवले. भारताला 98 धावांत 2 धक्के बसले.
पहिल्या डावात 75 धावा कुटणाऱ्या रवींद्र जडेजानं दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावलं. रोहित शर्मा सहकाऱ्यांना फलंदाजीचा सराव मिळावा म्हणून मैदानावर उतरला नाही. जडेजाने 77 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकारासह नाबाद 51 धावांवर रिटायर्ड होऊन पेव्हेलियनमध्ये परतला. हनुमा विहारीचाही फॉर्म परतला आणि त्यानं 105 चेंडूंत 3 चौकारांसह नाबाद 43 धावा केल्या. भारतानं 3 बाद 192 धावांवर दुसरा डाव घोषित करून कौंटी एकादशसमोर 284 धावांचे लक्ष्य ठेवले.
![]()