Join us  

India vs Bangladesh : वृद्धिमान साहा घेणार विराट कोहलीची 'शाळा'; जाणून घ्या नेमकं कारण

भारत विरुद्ध बांगलादेश ही मालिका खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेट इतिहासात नोंदवली जाणारी ठरली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 3:58 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश ही मालिका खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेट इतिहासात नोंदवली जाणारी ठरली आहे. भारत दौऱ्यावर येणारा बांगलादेशचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. 3 नोव्हेंबरपासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होणार असली तरी चाहत्यांना कोलकाता कसोटीची उत्सुकता आहे. भारतात प्रथम डे नाईट ( दिवस रात्र) कसोटी सामना खेळवला जाणार आहे आणि तोही ऐतिहासिक इडन गार्डनवर. पण, या सामन्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यष्टिरक्षक वृद्धिमान साहाकडून धडे गिरवायला शिकणार आहे. टीम इंडियासाठी डे नाईट कसोटीचा हा पहिलाच अनुभव असणार आहे. त्यामुळे सामन्यात कोणतीही उणीव राहू नये यासाठी साहा कर्णधार कोहलीची शाळा घेणार आहे. ही शाळा साहाच का घेणार?

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांसाठी डे नाईट कसोटीचा हा पहिलाच अनुभव असणार आहे. मर्यादित षटकांचे डे नाईट सामने आणि कसोटी यात खूप फरक आहे. सध्याच्या भारतीय संघात डे नाईट कसोटी खेळण्याचा अनुभव केवळ दोनच खेळाडूंकडे आहे आणि त्यापैकी एक साहा आहे. त्यामुळेच साहा बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी कोहलीची शाळा घेणार आहे. 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत ही कसोटी खेळवली जाणार आहे. या कसोटीला सामोरे जाण्यापूर्वी साहा संघातील सहकाऱ्यांसोबत डे नाईट कसोटीचा अनुभवाचे आदानप्रदान करणार आहे.

साहा म्हणाला,''हे आम्हा सर्वांसाठी नवं आव्हान आहे. आम्ही गुलाबी चेंडूनं कधी खेळलेलो नाही. स्थानिक क्रिकेटमध्ये मी गुलाबी चेंडूंच्या कसोटी सामन्यात खेळलो होतो. त्यामुळे आव्हान तर आहेच. पण, संघ म्हणून तुम्ही त्याचा सामना केलात, तर तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही.''

साहासह गोलंदाज मोहम्मद शमीकडे स्थानिक क्रिकेटमध्ये डे नाईट कसोटी खेळण्याचा अनुभव आहे. या दोघांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या सुपर लीग अंतिम सामन्यात मोहन बगान संघाचे प्रतिनिधित्व करताना भोवनीपूर क्लबविरुद्ध खेळ केला होता. साहा म्हणाला,''त्या सामन्याबद्दल मला फारसे आठवत नाही. शमीनं वेगवान गोलंदाजी केली होती आणि आम्ही जिंकलो होतो. पण, गुलाबी चेंडूवर खेळणं तितकं सोपं नक्की नाही.'' 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशवृद्धिमान साहाविराट कोहलीमोहम्मद शामी