Join us  

India vs Bangladesh : महेंद्रसिंग धोनीच्या समालोचन करण्यावर सस्पेन्स, BCCIच्या उत्तराची प्रतीक्षा

क्रिकेटपासून दूर गेलेला धोनी या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात समालोचकाच्या भूमिकेत दिसणार, अशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 4:55 PM

Open in App

कॅप्टन कूल धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो एकही सामना खेळलेला नाही आणि सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश या मालिकेतही त्याचा टीम इंडियात समावेश नाही. क्रिकेटपासून दूर गेलेला धोनी या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात समालोचकाच्या भूमिकेत दिसणार, अशी चर्चा रंगली होती. पण, धोनीच्या जवळच्या व्यक्तीनं ती शक्यता फेटाळून लावली आहे. त्यामुळे धोनीच्या आवाजात  ऐतिहासिक डे नाईट कसोटीचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

भारत दौऱ्यावर आलेला बांगलादेश संघ येथे तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिल्या ट्वेंटी-20त बांगलादेशनं सात विकेट्स राखून टीम इंडियाला पराभूत केले. भारताने ठेवलेले 149 धावांचे लक्ष्य बांगलादेशनं मुश्फिकर रहीमच्या नाबाद 60 धावांच्या खेळीवर पार केले. बांगलादेशनं प्रथमच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त भारताला पराभूत करण्याचा पराक्रम केला. मालिकेतील पुढील दोन सामने राजकोट ( 7 नोव्हेंबर) आणि नागपूर ( 10 नोव्हेंबर) येथे होतील. त्यानंतर पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरपासून इंदूर येथे, तर दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून कोलकाता येथे होणार आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यातून आणि मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली होती. नोव्हेंबर महिन्यापर्यंत तो विश्रांतीवर आहे. पण, तो इडन गार्डन कसोटीत दिसणार आहे. या कसोटीत धोनी मैदानावर जरी उतरणार नसला तरी त्याच्याकडे एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार होती. या सामन्यात धोनी पाहुणा समालोचक म्हणून दिसणार होता. पण, आता त्याबाबतची सस्पेन्स वाढला आहे.

या सामन्याचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीनं धोनीनं समालोचन करावे, असा प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे ( बीसीसीआय) पाठवला आहे. पण, अजूनही त्यांना बीसीसीआयकडून उत्तर मिळालेलं नाही. ''धोनीनं समालोचन करणार, हे शक्य नाही,'' असे धोनीच्या जवळच्या व्यक्तीनं सांगितलं.  

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारत विरुद्ध बांगलादेशबीसीसीआय