Join us  

दोन षटकार अन् रोहित शर्मा इतिहास घडवणार; एकाही भारतीयाला जमला नाही असा चमत्कार

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसरा व अंतिम सामना रविवारी नागपूर येथे खेळवला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 10:59 AM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसरा व अंतिम सामना रविवारी नागपूर येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका विजयाचा टीम इंडियाचा निर्धार आहे. त्याचवेळी बांगलादेशनेही ऐतिहासिक मालिका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे दोन्ही संघ नागपूर सामन्यात संपूर्ण ताकदीनं उतरतील हे निश्चित. या सामन्यासाठी भारतीय संघ राजकोटवरून नागपूरसाठी रवाना झाला आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. या सामन्यात दोन षटकार अन् रोहितच्या नावावर अविश्वसनीय विक्रम नोंदवला जाईल.

दुसऱ्या ट्वेंटी-20त  रोहितनं 43 चेंडूंत 6 चौकार व 6 षटकार खेचून 85 धावा चोपल्या. या सामन्यात रोहितनं अनेक विक्रमांना गवसणी घातली. एका वर्षांत सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम रोहितनं नावावर केला. रोहितनं  2019 मध्ये 65+ आंतरराष्ट्रीय षटकार खेचले आहेत. 2018 मध्ये त्याने 74, तर 2017 मध्ये 65 षटकार खेचले होते. आता त्याला आणखी एका विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. दुसरा सामना हा रोहितचा 100वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना होता. शंभर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना खेळणारा तो भारताचा पहिला, तर जगातला दुसरा खेळाडू ठरला. 

तिसऱ्या सामन्यात रोहितला 400 आंतरराष्ट्रीय षटकारांचा विक्रम नावावर करण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला नागपूरमध्ये केवळ दोन षटकार खेचावे लागतील. रोहितच्या नावावर सध्या 398 आंतरराष्ट्रीय षटकार आहेत. जर त्यानं नागपूरमध्ये दोन षटकार खेचले तर 400 आंतरराष्ट्रीय षटकार खेचणारा तो पहिला भारतीय, तर जगातला तिसरा फलंदाज ठरेल. या विक्रमात वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल ( 534) आणि पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी ( 476) अव्वल दोन स्थानांवर आहेत. रोहितनं वन डे क्रिकेटमध्ये 232, ट्वेंटी-20त 115 आणि कसोटीत 51 षटकार खेचले आहेत.  

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्माख्रिस गेलशाहिद अफ्रिदी