Join us  

India vs Bangladesh, 3rd T20I : रिषभ पंतच्या निराशाजनक कामगिरीवर कर्णधार रोहित शर्मा म्हणतो...

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसरा व अंतिम सामना रविवारी नागपूर येथे खेळवला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 3:29 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसरा व अंतिम सामना रविवारी नागपूर येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका विजयाचा टीम इंडियाचा निर्धार आहे. त्याचवेळी बांगलादेशनेही ऐतिहासिक मालिका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे दोन्ही संघ नागपूर सामन्यात संपूर्ण ताकदीनं उतरतील हे निश्चित.  भारतीय संघाला अजूनही काही आघाडींवर योग्य पर्याय सापडलेला नाही आणि अंतिम सामन्यात ही कमकुवत बाब टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकते. रिषभ पंतचे अपयश हे टीम इंडियासमोरील मोठी चिंता आहे. त्याबाबत कर्णधार रोहित शर्मानं मोठं विधान केलं.

तिसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने रिषभची पाठराखण केली. तो म्हणाला,''दर दिवशी, दर मिनिटाला रिषभ पंतच्या कामगिरीचीच चर्चा केली जात आहे. त्याला त्याचा खेळ करण्याची मुभा द्यायला हवी, असं मला वाटतं. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो, त्याच्यावर लक्ष ठेवणं सोडा. त्याला एकटे सोडा. तो बिनधास्त खेळाडू आहे आणि संघ व्यवस्थापनही त्याला मोकळीक देत आहे. त्यामुळे तुम्हीपण त्याच्यावर टीका करणं सोडाल, तर तो मुक्तपणे खेळू शकेल.'' 

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 त्यानं 22 सामन्यांत 20.70 च्या सरासरीनं 352 धावा केल्या आहेत, तर वन डेत त्यानं 22.90च्या सरासरीनं 229 धावा केल्या आहेत. 

टीम इंडियाच्या मजबूत व कमकुवत बाजूरोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल ही तगडी आघाडीची फळी भारताकडे आहे. रोहित आणि धवन यांनी आपापली भूमिका चोख बजावली आहे. राहुलला साजेशी कामगिरी करता आली नाही. श्रेयस अय्यर यानं साजेशी कामगिरी केली आहे. रिषभ पंत याचे अपयश हे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्याने यष्टिमागेही निराश केले आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याला बसवले जावे, अशी मागणी होत आहे. पंतला पर्याय म्हणून संघात संजू सॅमसन हा पर्याय आहे. शिवाय मनीष पांडेला संधी देऊन राहुलला यष्टिमागे जबाबदारी सांभाळण्यास देता येईल. 

गोलंदाजी हा भारतासाठी चिंतेची बाब आहे. प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना संधी मिळालीय, परंतु त्यांना त्यावर खरे उतरता आलेले नाही. युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी फिरकीची जबाबदारी सक्षमपणे पेलली आहे. पण, जलद माऱ्यात टीम इंडियाला मार खावा लागला आहे. दीपक चहरच सातत्यपूर्ण खेळ करताना पाहायला मिळत आहे. त्याला खलिल अहमदकडून साजेशी साथ मिळालेली नाही. नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शिवम दुबेकडे तितकासा अनुभव नाही. त्यामुळे खलिल आणि शिवम यांच्या जागी अनुक्रमे शार्दूल ठाकूर व मनीष पांडे यांना संधी मिळू शकते. पण, रोहित आहे तोच संघ तिसऱ्या सामन्यातही कायम ठेवण्याची शक्यता अधिक आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरिषभ पंतरोहित शर्मा