Join us  

India vs Bangladesh, 2nd T20I : रोहित शर्मा आज इतिहास घडवणार; पाहा या ऐतिहासिक क्षणाबद्दल त्याचं मत

India vs Bangladesh, 2nd T20I : Rohit Sharma is all set to play his 100th T20I tonight, Watch the Hitman share his thoughts 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 5:06 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या ट्वेंटी-20त यजमानांना पराभव पत्करावा लागला. पण, हे अपयश मागे सोडून टीम इंडिया राजकोट येथे होणाऱ्या ट्वेंटी-20त विजय मिळवण्याच्या निर्धारानं मैदानावर उतरणार आहे. राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी मैदानावर उतरताच कर्णधार रोहित शर्मा अनोखं शतक साजरं करणार आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 सामने खेळण्याचा विक्रम रोहितच्या नावावर नोंदवला जाणार आहे. 

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये शंभर सामने खेळणारा तो पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरणार आहे. पहिल्या सामन्यात त्यानं 99 सामन्यांचा पल्ला गाठून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा 98 सामन्यांचा विक्रम मोडला होता. आता त्याला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांचे शतक साजरे करण्याची संधी आहे. भारताकडून हा मान पहिला ( पुरुष/महिला) महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं पटकावला. शिवाय रोहित या कामगिरीसह पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या विक्रमाशी बरोबरी करणार आहे.  

या ऐतिहासिक क्षणाबद्दल रोहित म्हणाला,'' इतके सामने खेळेन असं वाटलं नव्हतं. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. अनेक चढउतार आले. चुकांतून शिकत गेलो. त्यातून वाट काढत मी आज 100वा ट्वेंटी-20 सामना खेळणार आहे, याचा अभिमान आहे. ट्वेंटी-20तील चारही शतक अविस्मरणीय आहेत. यापैकी आवडती खेळी कोणती, असं नाही सांगू शकत. पण, पहिले शतक हे नेहमीच खास असतं. त्या शतकानंतर आम्ही हरलो, याचे दुःख. पण त्यानंतर झळकावलेले तीनही शतक हे टीमच्या विजयाला हातभार लावणारे ठरले. आणखी अशाच अविस्मरणीय खेळी करण्यासाठी उत्सुक आहे.''

मोठी अपडेट्स; राजकोट सामन्याला 'महा'चा फटका? जाणून घ्या ग्राऊंड रिपोर्ट 

या सामन्यावर महा चक्रीवादळाचे सावट आहे. पण, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पण, हा सामना जेथे होणार आहे तेथील ग्राऊंड रिपोर्ट समोर आला आहे. माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने हा रिपोर्ट दिला आहे. या सामन्यासाठी आकाश चोप्रा राजकोट येथे दाखल झाला आहे आणि तेथे पोहोचताच त्यानं एक ट्विट केलं आहे. ''राजकोटमध्ये लख्ख सुर्यप्रकाश आहे,'' असे त्यानं लिहिलं आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्माशोएब मलिकमहेंद्रसिंग धोनीबीसीसीआय