सध्या सुरू असलेल्या महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये गुरुवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य लढतीत भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवर अंतिम फेरीत धडक दिली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३३९ धावांच्या आव्हानाचा भारतीय संघाने ९ चेंडू आणि पाच विकेट्स राखून आरामात पाठलाग केला. आता २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम लढतीत भारतीय संघाची गाठ दक्षिण आफ्रिकेशी पडणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या थरारक विजयानंतर भारतीय संघाचं चौफेर कौतुक होत आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यानेही खास पोस्ट करून भारतीय महिला संघाचं कौतुक केलं आहे.
विराट कोहलीने भारतीय संघाचं कौतूक करताना एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात विराट म्हणाला की, ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यावर आपल्या संघानं मिळवलेला विजय जबरदस्त होता. मुलींनी धावांचा जोरदार पाठलाग केला. एका मोठ्या सामन्यात जेमिमा हिची कामगिरी सुरेख झाली. हा विजय हिंमत, विश्वास आणि ध्यासाचं उत्तम प्रदर्शन होता. भारतीय संघाने खूप चांगला खेळ केला, असे विराटने सांगितले.
त्याने पुढे लिहिले की, लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघातील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. यामध्ये जेमिमा रॉड्रिक्सने सर्वाधिक प्रभावित केले. जेमिमा हिने दबावाखाली खूप चांगली फलंदाजी करत संघाला विजयाजवळ पोहोचवले. तिच्या खेळीने केवळ सामन्याचं चित्रच बदलवलं नाही तर मोठ्या सामन्यांमध्ये ती संघासाठी खूप विश्वसनीय खेळाडू ठरू शकते, हे तिने दाखवून दिले, असे कौतुकौद्गार विराट कोहलीने काढले.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात जेमिना रॉड्रिग्स हिने १३४ चेंडूत नाबाद १२७ धावांची खेळी केली. जेमिमा हिने कर्णधार हममनप्रित कौर हिच्यासोबत शतकी भागीदारी करत भारतीय संघाला सामन्यात पुनगारमन करून दिले. त्यानंतर जेमिमाने दीप्ती शर्मा, रिचा घोष आणि अमनज्योत कौर यांच्यासोबत छोट्या पण उपयुक्त भागीदाऱ्या करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.