ठळक मुद्देलोकेश राहुलने सराव सामन्यातही अपयशाचा पाढा कायम वाचलाविराट कोहलीने बॅटवर हात साफ करताना केल्या 64 धावाभारताच्या 358 धावा, क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश बिनबाद 24 धावा
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : लोकेश राहुलने क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश विरुद्धच्या सराव सामन्यातही अपयशाचा पाढा कायम वाचला. सराव सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, लोकेश पुन्हा अपयशी ठरला. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीने बॅटवर हात साफ करण्याची संधी सोडली नाही. त्याने युवा फलंदाज पृथ्वी शॉ याच्यासह अर्धशतकी भागीदारी करताना संघाला मजबूत स्थितीत आणले. मात्र, आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कोहलीची घोडदौड 19 वर्षांच्या ॲरोन हार्डीने रोखली. त्याने स्वतःच्याच गोलंदाजीवर कोहलीचा झेल टिपला.
लोकेश राहुल अवघ्या 3 धावांवर माघारी परतला. 1 बाद 16 अशा अवस्थेतून पृथ्वी शॉने भारताच्या डावाला आकार दिला. त्याने 69 चेंडूत 66 धावा केल्या. कसोटी क्रिकेट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारानेही 54 धावांची खेळी केली. त्याला ल्युक रॉबीनने बाद केले. पुजाराने कोहलीसह 72 धावांची भागीदारी केली. कोहलीने सातत्यपूर्ण खेळ कायम करताना आणखी एक अर्धशतक नावावर केले. तो मोठी खेळी करेल असे वाटत असताना हार्डीने त्याला बाद केले. 19 वर्षीय गोलंदाजासाठी ही अविस्मरणीय विकेट ठरली.
अजिंक्य रहाणे (56) आणि हनुमा विहारी (52) यांनी अर्धशतक केले. सातव्या क्रमांकावर आलेल्या रोहित शर्मानेही 55 चेंडूत 40 धावा केल्या. भारताने दुसऱ्या दिवशी 358 धावा केल्या. प्रत्युत्तरात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बिनबाद 24 धावा केल्या आहेत.