- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण
चार सामन्यांच्या मालिकेत पहिल्या दोन कसोटीनंतर भारत - आॅस्टेÑलिया संघांदरम्यान १-१ अशी बरोबरी आहे. एमसीजीच्या सुंदर मैदानावर बुधवारपासून सुरु होणारा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. एकापेक्षा अधिक बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळलो असल्यामुळे मैदानावर विशेषत: पहिल्या दिवशी वातावरण शानदार असतं, याचा अनुभव मी घेतला आहे. भारताने या वातावरणाचे दडपण न बाळगता त्याच्यासोबत जुळवून घेत शानदार कामगिरी करायला हवी.
या कसोटीसाठी भारताने तीन विभागात कुठलाही वेळ न दवडता सुधारणा करायला हवी. त्यात पहिला विभाग म्हणजे सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात करून द्यायला हवी, जम बसल्यानंतर फलंदाजांकडून मोठी खेळी अपेक्षित आणि तळाच्या फलंदाजांकडून उपयुक्त योगदान आवश्यक. तळाच्या फलंदाजांनी फटकावलेल्या धावा अखेर निर्णायक ठरतात, असा अनुभव आहे.
सर्वप्रथम सलामीच्या जोडीबाबत बोलताना एमसीजीवर मयंक अग्रवालला संधी मिळायला हवी. गुणवत्ता, समर्पण आणि कर्नाटक व भारत ‘अ’ संघांतर्फे मोठ्या खेळी केल्यामुळे त्याला भारतीय संघात संधी मिळाली आहे. तो फ्रेश व सकारात्मक मानसिकतेने येथे दाखल झाला आहे. त्याच्यावर लोकेश राहुलसारखे दडपण नाही. राहुलला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गेल्या ९ कसोटी सामन्यांतील अपयशामुळे त्याचे मनौर्धय ढासळले आहे. त्याची बाद होण्याची पद्धत जवळजवळ मिळतीजुळतीच असते. ब्रेक मिळाल्यानंतर या युवा खेळाडूला आपल्या चुका सुधारण्यासाठी मदत होईल. पर्थमध्ये मुरली विजयने दुसऱ्या डावात खेळपट्टीवर पाय रोवण्याची मानसिकता दाखविली. त्यामुळे तिसºया कसोटी तरी त्याला संघात कायम ठेवावे, असे मला वाटते.
भारतीय फलंदाजांनी या मालिकेत दोन शतके झळकावली आहेत, हे जरी खरे असले तरी जम बसलेल्या फलंदाजाने विकेट गमावणे संघाला परवडणारे नाही. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी शानदार खेळ करीत अनुक्रमे अॅडलेड व पर्थमध्ये वैयक्तिक शतके झळकावली. भारताला मात्र यापेक्षा अधिक शतकांची अपेक्षा आहे. पर्थ कसोटीत अजिंक्य रहाणे व पुजारा यांच्याकडून आणखी शतकाची अपेक्षा होती.
आॅस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांची कामगिरीही भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. भारतीय गोलंदाज दिग्गज फलंदाजांविरुद्ध वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरत असताना तळाच्या फलंदाजांविरुद्ध मात्र ते अधिक प्रयत्न करीत असल्यामुळे त्यांच्या पदरी निराश येते. आॅस्ट्रेलियाचे तळाचे फलंदाज उपयुक्त भागीदारी करीत संघाला आव्हानात्मक मजल मारून देण्यात यशस्वी ठरतात. त्यामुळे आघाडीच्या फळीला गुंडाळल्यानंतर तळाच्या फलंदाजांनाही मोठी खेळी करण्यापासून रोखणे महत्त्वाचे आहे.