Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS Test : भारतीय संघाच्या सराव सामन्यात पावसाचा व्यत्यय

India vs Australia Test: ट्वेंटी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला बरोबरीत रोखल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेच्या तयारीला जोमाने लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 08:43 IST

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघाच्या सराव सामन्यात पावसाचा व्यत्ययभारत-ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना 6 डिसेंबरपासूनतीन तासांहून अधिक काळ पावसाची फलंदाजी

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ट्वेंटी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला बरोबरीत रोखल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेच्या तयारीला जोमाने लागला आहे. कसोटी मालिकेच्या पूर्वतयारीसाठी किमान दोन सराव सामने खेळवण्यात यावे अशी विनंती मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र, दौऱ्याचे वेळापत्रक पाहता हे शक्य नसल्याने भारताच्या वाट्याला एक सराव सामना आला. हा चार दिवसांचा सराव सामना बुधवारपासून सुरू होणार होता, परंतु पावसाच्या दमदार हजेरीने सामन्याच्या पहिल्या दिवसावर जवळपास पाणी फिरल्यात जमा आहे.दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेत आलेल्या अपयशातून धडा घेत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी तयार आहे. त्यासाठी कसोटी संघातील काही खेळाडूंना भारत A संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर पाठवण्यात आले. तर उर्वरित खेळाडूंनी ट्वेंटी-20 मालिकेत हात साफ केले. मात्र, संघाचा योग्य समतोल बनवण्यासाठी सराव सामना महत्त्वाचा होता, परंतु पावसाने तीन-साडेतीन तास तुफान बॅटींग केली. या सराव सामन्यात चांगली कामगिरी करून कसोटी मालिकेसाठी आत्मविश्वास मिळवण्याचा भारतीय खेळाडूंचा प्रयत्न आहे. त्यासाठी मंगळवारी भारतीय खेळाडूंनी नेटमध्ये कसून सराव केला. भारताने ऑस्ट्रेलियात 11 कसोटी मालिका खेळल्या, परंतु त्यात एकदाही बाजी मारता आली नाही. 2014मध्ये भारताला 0-2 असा पराभव पत्करावा लागला होता आणि त्यानंतर भारतीय संघ 2018 मध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. 2018 मध्ये भारताने नऊ कसोटी सामने खेळले आणि त्यातील पाच जिंकले. त्याउलट ऑस्ट्रेलियाला सात कसोटींत केवळ दोनच विजय मिळवता आले आहेत. त्यामुळे भारताला येथे मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. दोन महिन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ या मालिकेत फेव्हरिट मानला जात आहे. आयसीसी क्रमवारीत भारतीय अव्वल स्थानावर आहे, म्हणून त्यांचे पारडे जड नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची अनुपस्थिती भारतासाठी पोषक आहे. त्यामुळे कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ इतिहास घडवेल असा, अनेकांना विश्वास आहे. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआयविराट कोहली