India vs Autstralia: फायनलसाठी टीम इंडियाचे दमदार, हे सहा शिलेदार!

भारत विजयाची ही संधी सहजासहजी सोडणार नाहीच. यासाठी भारताची मदार आहे ती या सहा रत्नांवर. यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 08:49 AM2023-11-19T08:49:23+5:302023-11-19T08:50:13+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia: Team India's strong six players with rohit sharma and virat kohli | India vs Autstralia: फायनलसाठी टीम इंडियाचे दमदार, हे सहा शिलेदार!

India vs Autstralia: फायनलसाठी टीम इंडियाचे दमदार, हे सहा शिलेदार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रोहित नाईक, वरिष्ठ उपसंपादक

फिर हेरा फेरी’ चित्रपटातील एक संवाद आहे, ‘मेरे को तो ऐसा धकधक हो रेला है रे..’ अगदी अशीच अवस्था आज प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याची झाली आहे. विश्वचषकात भलेही आपला संघ अपराजित राहिला आहे, पण अंतिम सामन्यात गाठ आहे ती बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी. स्पर्धेत कसाही खेळो, पण अंतिम सामन्यात मात्र या संघाला झुंजवणे अत्यंत आव्हानात्मक ठरते. तरी, भारत विजयाची ही संधी सहजासहजी सोडणार नाहीच. यासाठी भारताची मदार आहे ती या सहा रत्नांवर. यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. 

रोहित शर्मा
कर्णधार म्हणून रोहितने क्षमता कधीच दाखवून दिली. कपिलदेव, महेंद्रसिंग धोनी या विश्वविजेत्या कर्णधारांच्या पंक्तीत बसण्यापासून तो केवळ एक विजय दूर आहे. चतुर आणि कल्पक नेतृत्वासह रोहितची आक्रमक फटकेबाजी फायदेशीर ठरत आहे. तो वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक खेळाला अधिक महत्त्व देतो. म्हणूनच शतक, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असतानाही त्याने धोकादायक फटके खेळले आहेत. त्याच्यामुळे होणारी वेगवान सुरुवात भारताच्या प्रत्येक सामन्यातील विजयाचा पाया ठरला आहे.

विराट कोहली 
कोहलीने यंदाचा विश्वचषक गाजवला. सचिन तेंडुलकरचा ४९ एकदिवसीय शतकांचा विश्वविक्रम मोडलेल्या कोहलीने विश्वचषक स्पर्धेच्या एका सत्रात सर्वाधिक धावांचा सचिनचाच विश्वविक्रमही मोडला. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी ढेपाळल्यानंतर कोहलीने लोकेश राहुलसह संयमी खेळी करत भारताचा विजय साकारला. यानंतर त्याने जवळपास सर्वच सामन्यांत आपले मोलाचे योगदान दिले. त्याची फलंदाजी भारताची मुख्य ताकद आहे हे नक्की.

जसप्रीत बुमराह 
दुखापतीमुळे वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिलेल्या जसप्रीत बुमराहने यंदा जबरदस्त पुनरागमन केले. स्पर्धेत भेदक माऱ्याच्या जोरावर तो फलंदाजांना जखडवून ठेवतो. आत वेगाने घुसणारे चेंडू, अचूक यॉर्कर, मधेच बाऊन्सर अशा वैविध्यपूर्ण गोलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी संघांसाठी बुमराह धोकादायक गोलंदाज बनला आहे. त्याचा मारा निर्णायक ठरेल.

मोहम्मद शमी 
शमी म्हणजे भारतीय संघाला लाभलेला परिस म्हणावा लागेल. नेदरलँड्स विरुद्धचा सामना वगळता प्रत्येक सामन्यात त्याने फलंदाज बाद करण्याचा सपाटाच लावला. केवळ ६ सामने खेळून तो स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने या स्पर्धेत तीनवेळा अर्धा संघ बाद करण्याचा पराक्रम केला आहे. अंतिम सामन्यात तो कांगारूंना पिटाळू शकतो. 

लोकेश राहुल
राहुलची कामगिरीही यंदाच्या विश्वचषकात शानदार ठरली. त्याने फलंदाजऐवजी यष्टिरक्षक म्हणून अधिक मोलाची कामगिरी केली आहे. अनेक सामन्यांत त्याने अचूक डीआरएस निर्णय घेण्यात मदत केल्याने भारताला मोठा फायदा झाला. त्याच्या यष्टिरक्षण कौशल्यामुळे अनेकांनी महेंद्रसिंग धोनीचीही आठवण काढली. मधल्या फळीतील त्याच्या भक्कम फलंदाजीमुळे आघाडीच्या फलंदाजांना मोकळेपणे खेळण्याची सूट मिळत आहे.

श्रेयस अय्यर
श्रेयसने सर्वात मोठी चिंता या स्पर्धेतून मिटवली. अनेक वर्षांपासून भारताला चौथ्या क्रमांकासाठी भक्कम फलंदाजाची गरज होती. श्रेयसने या जागी धावांची टाकसाळ खुली केली. सलग दोन शतकी खेळांसह त्याने ५०० हून अधिक धावा काढल्या. अशी कामगिरी करणारा तो चौथ्या क्रमांकावरील पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या या सातत्यामुळे रोहित-कोहली यांच्यावरील दडपणही दूर झाले. अशाच कामगिरीची श्रेयसकडून अपेक्षा आहे.

काही दुखापती चांगल्या ठरतात! 

स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याची कामगिरी भारतासाठी महत्त्वाची ठरणार होती. पण, त्याला ४ सामन्यांत केवळ ११ धावा आणि ५ बळी अशीच कामगिरी करता आली. बांगलादेश विरुद्धच्या लढतीत तो दुखापतग्रस्त झाला व नंतर स्पर्धेबाहेरच गेला. त्याच्या दुखापतीमुळे मोहम्मद शमीची संघात एन्ट्री झाली. जर हार्दिक दुखापतग्रस्त झाला नसता, तर कदाचित शमीला संधीच मिळाली नसती. त्यामुळेच हार्दिकची दुखापत भारताच्या वाटचालीतील निर्णायक क्षण ठरला. यासाठीच चाहतेही म्हणत आहेत की, काही दुखापती चांगल्याही असतात.

Web Title: India vs Australia: Team India's strong six players with rohit sharma and virat kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.