ठळक मुद्देभारत-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी 6 डिसेंबरपासूनभारतीय संघाला जिंकण्याची सुवर्णसंधीस्टीव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीचा यजमानांना फटका
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ट्वेंटी-20 मालिकेतील 1-1 अशा बरोबरीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी कसोटी मालिकेकडे मोर्चा वळवला आहे. बंदी हटवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या संघाला मैदानाबाहेरून मार्गदर्शन करत आहेत. भारतीय संघाला रोखण्याचा मंत्र हे दोघेही गोलंदाजांना देत आहेत. सोमवारी स्मिथ आणि वॉर्नर यांनी संघासोबत सरावही केला. त्यात भर म्हणून स्मिथने सिडनीतील एका हॉटेलमध्ये प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्यासह बराच काळ चर्चा केली. स्मिथ व लँगर एकत्र ब्रेकफास्ट करत असल्याचा व्हिडीओ एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केला.
चार सामन्यांच्या या मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाने कंबर कसली असली तरी यजमान ऑस्ट्रेलियाही पूर्णपणे तयार आहे. भारतीय संघाला रोखायचं कसं यासाठी त्यांना स्मिथ व वॉर्नर यांच्याकडून मंत्र दिला जात आहे. या दोघांनी नेटमध्ये फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच सराव करून घेतला आहे.
बॉल टेम्परिंग प्रकरणामुळे स्मिथ व वॉर्नर यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली. त्यांना कसोटी मालिकेत खेळता यावे यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून बरेच प्रयत्न झाले, परंतु त्यांच्यावरील बंदी उठवली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून बॅनक्रॉफ्ट याने चेंडू कुरतडला. त्याची ही लबाडी कॅमेरात पकडली गेली आणि त्यानंतर कर्णधार स्मिथ व उपकर्णधार वॉर्नर यांच्या सांगण्यावरून हे घडल्याचे समोर आले. म्हणून स्मिथ व वॉर्नर यांच्यावर प्रत्येकी एक-एक वर्षांची, तर बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. बॅनक्रॉफ्टवरील बंदीचा कालावधी डिसेंबरमध्ये संपणार आहे.
मात्र, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेचे महत्त्व लक्षात घेता स्मिथ व वॉर्नरची अनुपस्थिती ऑस्ट्रेलियासाठी महागात पडणारी आहे. त्यामुळे स्मिथ व वॉर्नर यांच्याकडून विराटसेनेला रोखायचे कसे, याबाबत ऑस्ट्रेलियाचा संघ मार्गदर्शन घेत आहे. स्मिथने प्रशिक्षक लँगर यांना काही सिक्रेट टिप्स दिल्याची चर्चा आहे. त्याला दुजोरा देणारा व्हिडीओ समोर आला आहे.