Join us  

India vs Australia : टीम इंडियाला नमवण्यासाठी कांगारूंचा मास्टर प्लान; उतरवणार हुकुमी एक्का 

भारतानं 2020मधील पहिल्याच मालिकेत श्रीलंकेला नमवून नववर्षाची दणक्यात सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 12:32 PM

Open in App

भारतानं 2020मधील पहिल्याच मालिकेत श्रीलंकेला नमवून नववर्षाची दणक्यात सुरुवात केली. पुण्यात झालेल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत भारतानं 78 धावांनी विजय मिळवताना मालिका 2-0 अशी खिशात घातली. आता टीम इंडियाला तगड्या ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातली तीन वन डे सामन्यांची मालिका 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना होणार आहे. टीम इंडियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवणे सोपं नक्की नसेल आणि याची जाण कांगारुंना आहे. त्यामुळे त्यांनी टीम इंडियावर विजय मिळवण्यासाठी एक मास्टर प्लान तयार केला आहे.

टीम इंडिया जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती, तेव्हा संघात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे महत्त्वाचे खेळाडू नव्हते. पण, या मालिकेत ते टीम इंडियासमोर कडवे आव्हान उभ करण्यासाठी सज्ज आहेत. एक वर्षांच्या बंदीनंतर स्मिथ आणि वॉर्नर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कमबॅक केले. स्मिथनं अॅशेस मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. वॉर्नरनं इंडियन प्रीमिअर लीगनंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत उल्लेखनीय खेळी केली. त्यामुळे टीम इंडियासमोर हे दोन फलंदाज कडवे आव्हान उभे करू शकतात.

पण, या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं संघात एक हुकुमी एक्का मैदानावर उतरवण्याची तयारी केली आहे. या खेळाडूसाठी स्मिथला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास पाठवण्याची रणनीती ऑसींनी आखली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत स्मिथ चौथ्या क्रमांकावर खेळला होता. पण, आता ऑसींनी 2023च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळेच त्यांनी स्मिथला एक स्थानाचे प्रमोशन दिले आहे. ''स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या स्थानावर खेळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर, अॅरोन फिंच आणि स्मिथ अशी ही आघाडीची फळी असेल,''अशी माहिती ऑस्ट्रेलियाचे प्रभारी प्रशिक्षक अँण्ड्य्रू मॅक्डोनाल्ड यांनी दिली. 

स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर खेळणार याचा अर्थ कसोटी क्रिकेट गाजवणारा मार्नस लाबुशेन चौथ्या क्रमांकावर खेळण्यास  सज्ज आहे. भारताविरुद्ध तो आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात पदार्पण करण्याची शक्यता आहे. या स्थानासाठी पीटर हँड्सकोम्ब, अॅश्टन टर्नर आणि अॅश्टन अॅगर यांच्यातही चुरस आहे. आता ऑस्ट्रेलियात अतिरिक्त फलंदाजांसह उतरते की अष्टपैलू खेळाडूसह यावर सर्व गणित अवलंबून आहे.

ऑस्ट्रेलिया - अ‍ॅरोन फिंच ( कर्णधार), डी'आर्सी शॉर्ट, अ‍ॅश्टन अ‍ॅगर, अ‍ॅलेक्स करी ( यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लॅबुश्चॅग्ने, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अ‍ॅश्टन टर्नर, डेव्हीड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

भारत - विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत. केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह

वेळापत्रक14 जानेवारी - मुंबई17 जानेवारी - राजकोट19 जानेवारी - बंगळुरू   

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथडेव्हिड वॉर्नरअ‍ॅरॉन फिंच