सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला. या मालिकेत भारतीय संघातील खेळाडूंची कामगिरी चर्चेत राहिली, परंतु त्याच बरोबर दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये रंगलेली शेरेबाजीही चांगलीच गाजली. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंतला दिलेला बेबी सीटरचा सल्ला आणि त्यानंतर पंतने दिलेले उत्तर, याचीच हवा राहिली. कसोटी मालिका संपल्यानंतरही पंतच्या मागे लागलेला बेबी सीटरचा टॅग काही केल्या जाण्याचं नाव घेत नाही. याच टॅगचा आधार घेत रोहित शर्माने पंतची टर उडवली आहे.
कसोटी मालिकेतील विजयानंतर भारतीय संघ वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना 12 जानेवारीला होणार आहे. या मालिकेसाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, युझवेंद्र चहल, केदार जाधव, खलील अहमद आणि रोहित शर्मा सिडनीत दाखल झाले आहेत. रोहित कसोटी मालिकेत भारतीय संघाचा सदस्य होता, परंतु त्याला कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे तिसऱ्या कसोटीनंतर भारतात परतावे लागले. मुलीचं बारसं करून रोहित पुन्हा राष्ट्रीय कर्तव्यासाठी सिडनीत दाखल झाला आहे.
सिडनीत दाखल होताच त्याने पंतची टर उडवली. कसोटी मालिकेत भारताकडून दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा करणाऱ्या पंतने बुधवारी एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. तो फोटो रिट्विट करून रोहितने पंतची थट्टा उडवली. नुकताच बाबा झालेल्या रोहितने पंतला बेबी सीटर होशील का असे विचारले. रोहितनचे लिहीले की,''शुभ प्रभात बडी.. तु चांगला बेबी सीटर आहेस, असं मी ऐकलं आहे. आता आम्हाला बेबी सीटरची तातडीनं गरज आहे. तु असशील तर रितिकालाही आनंद होईल.''