ठळक मुद्देपहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात भारताचा अवघ्या चार धावांनी पराभवसलामीवीर शिखर धवनची 76 धावांची खेळी व्यर्थऑस्ट्रेलियाची ट्वेंटी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी
ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. विजयाचा घास तोंडाशी आलेला असताना भारताला पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात अवघ्या चार धावांनी हार मानावी लागली. ऑस्ट्रेलियाने विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने 17 षटकांत 4 बाद 158 धावा केल्या होत्या, परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे भारतासमोर 174 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. भारताने 17 षटकांत 7 बाद 169 धावा केल्या. सलामीवीर शिखर धवनने 76 धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला होता. मात्र, रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना त्यावर विजयी कळस चढवता आला नाही.
सामन्यानंतर कर्णधार
विराट कोहलीने पराभवामागचे कारण सांगितले. पंतची विकेट हा टर्निंग पॉईंट असून त्यानंतर सामना डोलायमान अवस्थेत गेला, असे कोहली म्हणाला. या सामन्यात कोहलीलाही (4) साजेशी कामगिरी करता आली नाही. अॅडम झम्पाच्या गोंलदाजीवर तो माघारी फिरला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कमबॅक करताना पंत (20) आणि कार्तिक (30) यांना बाद करून भारतासमोरील अडचणीत वाढवल्या. कोहली म्हणाला,'' हा सामना डोलायमान अवस्थेत होता. फलंदाजांनी सुरुवात चांगली केली, मधल्या फळीत अडखळलो. पंत आणि कार्तिकच्या फटकेबाजीमुळे सामना जिंकू असे वाटत होते, परंतु पंतची विकेट गेली आणि सामना गमावला.''
कोहलीने यावेळी धवनच्या खेळीचे कौतुक करण्याची संधी गमावली नाही. धवनने 42 चेंडूंत 10 चौकार व 2 षटकार खेचून 76 धावा केल्या. सलामीवर रोहित शर्मा मात्र लवकर माघारी परतला. कोहली म्हणाला,'' रोहित बाद झाल्यानंतर धवनने सामन्याची सूत्र हातात घेत चांगला खेळ केला. तो आक्रमक सलामीवीर आहे. त्याने ट्वेंटी-20त शतक झळकावले नसले तरी त्याची खेळी संघासाठी फायद्याचीच असते.''
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा ट्वेंटी-20 सामना शुक्रवारी मेलबर्न येथे होणार आहे.