Join us
Daily Top 2Weekly Top 5

India Vs Australia : भारतात सराव सामने खेळणे निरर्थक, स्टीव्ह स्मिथचं विधान

India Vs Australia : इंग्लंड दौऱ्यात साधारणपणे आम्ही दोन सराव सामने खेळतो, पण यंदा भारत दौऱ्यात आम्ही एकही सराव सामना खेळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 06:26 IST

Open in App

सिडनी : ‘भारत दौऱ्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतातील खेळपट्ट्यांवर सराव सामने खेळणे निरर्थक ठरणार आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे सराव करून आमची तयारी करू,’ असे सांगत, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि मुख्य फलंदाज स्टिव्ह स्मिथ याने बॉर्डर-गावसकर चषक मालिकेआधी दंड थोपटले आहेत. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे (बीसीसीआय) सराव सामन्यासाठी गवताळ खेळपट्टी मिळत असून, प्रत्यक्ष सामन्यात फिरकीस अनुकूल खेळपट्टी तयार करण्यात येत असल्याचे कारण देत, कांगारूंनी भारत दौऱ्यात एकही सराव सामना न खेळण्याची भूमिका घेतली आहे. सोमवारी स्मिथ चौथ्यांदा सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेटपटू ठरला. त्याने संघाला सराव सामन्याच्या तुलनेत सराव सत्रातून अधिक फायदा होईल, असे म्हटले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली १८ सदस्यांच्या ऑस्ट्रेलियन संघाने भारतात येण्याआधी सिडनी येथे फिरकीस अनुकूल खेळपट्ट्यांवर सराव शिबिर आयोजित केले आहे. यानंतर, ९ फेब्रुवारीला नागपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा संघ बंगळुरू येथे आठवडाभर सराव करणार आहे.

भारताकडे रवाना होण्याआधी स्मिथने म्हटले की, ‘इंग्लंड दौऱ्यात साधारणपणे आम्ही दोन सराव सामने खेळतो, पण यंदा भारत दौऱ्यात आम्ही एकही सराव सामना खेळणार नाही. गेल्या वेळी जेव्हा आम्ही भारतात गेलो होतो, तेव्हा आम्हाला सरावासाठी गवताळ खेळपट्टी मिळाली होती. हे निरर्थक आहे. त्यामुळे यावेळी आम्हाला सरावासाठी योग्य सुविधा मिळतील अशी आशा आहे.’ 

भारतात गोलंदाजी करणे आव्हानात्मक - मॉरिस‘भारतात कसोटी मालिकेत गोलंदाजी करणे आव्हानात्मक ठरणार असून, यातून खूप काही शिकण्याची संधी मिळेल,’ असे ऑस्ट्रेलियाचा युवा वेगवान गोलंदाज लान्स मॉरिस याने सांगितले. २४ वर्षीय मॉरिसला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले आहे. सिडनी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. मात्र, भारत दौऱ्यात त्याला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. मॉरिस म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचे, तर भारतातील वेगवान माऱ्याबाबतची जी माहिती मिळाली, ती फार चांगली नव्हती. त्यामुळे येथे वेगवान गोलंदाजी करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. संघाच्या सराव सत्रात अनुभवी खेळाडूं- कडून काही मोलाचे सल्ले मिळाले. या दौऱ्यात मी अधिकाधिक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करेन.’

टॅग्स :स्टीव्हन स्मिथभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App