Join us

India vs Australia : संघात नसतानाही मैदानावर 'धोनी... धोनी...'चा गजर होतो तेव्हा...

India vs Australia : मोहाली येथील क्रिकेट स्टेडियमने रविवारी ऐतिहासिक सामन्याचा थरार अनुभवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 14:36 IST

Open in App

मोहाली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मोहाली येथील क्रिकेट स्टेडियमने रविवारी ऐतिहासिक सामन्याचा थरार अनुभवला. भारतीय संघाने उभा केलेला 358 धावांचा डोंगर ऑस्ट्रेलियाने सहज सर करून पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत 2-2 अशी बरोबरी मिळवली.  शिखर धवनच्या 143 धावांची खेळी आणि रोहित शर्माची ( 95) त्याला मिळालेली साथ, याच्या जोरावर भारताने 358 धावांचा डोंगर उभा केला. मात्र, पाहुण्या ऑस्ट्रेलियाने भारताच्या विजयाच्या आशांवर पाणी फिरवले. ऑस्ट्रेलियाने चार विकेट्स राखून 47.5 षटकांतच विजयावर शिक्कामोर्तब केले. 

350हून अधिक धावांचा डोंगर उभा करून भारताला विजय आपलाच असे वाटले होते, परंतु ऑस्ट्रेलियाने त्यांना पराभवाची चव चाखवली. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज अवघ्या 12 धावांवर माघारी परतले होते. मात्र, उस्मान ख्वाजा (91) आणि पीटर हँड्सकोम्ब (117) यांनी विक्रमी 192 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला विजयाचा मार्ग दाखवला. त्यानंतर अ‍ॅस्टन टर्नरने जोरदार फटकेबाजी करून ऑस्ट्रेलियाचा विजय पक्का केला. टर्नरने 43 चेंडूंत 84 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीत 5 खणखणीत षटकारांसह 6 चौकारांचा समावेश होता.

या सामन्यात दोन्ही संघाच्या फलंदाजांची कामगिरी लक्षवेधी ठरली असली तरी भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत हा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. या सामन्यात नटाची भूमिका वटवणाऱ्या टर्नरला यष्टिचीत करण्याची सोपी संधी पंतने गमावली आणि त्यामुळे त्याच्यावर टीका झाली. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आल्यामुळे पंतला संधी मिळाली. वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही पंतचा राखीव यष्टिरक्षक म्हणून विचार केला जात आहे. मात्र, मोहाली वन डे तील कामगिरीमुळे त्याला संधी देऊ नये अशी मागणी जोर धरत आहे. पंतच्या निराशाजनक कामगिरीमुळे चाहतेही चांगलेच भडकले आणि त्यांनी पंतच्या प्रत्येक चुकीवर मैदानावर धोनी... धोनी असा गजर सुरू केला. सामन्याच्या 44व्या षटकात युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर फटका मारण्यासाठी टर्नर पुढे गेला, परंतु चेंडू डाव्या बाजूनं चकवा देत पंतच्या हाती झेपावला. मात्र, पंतला त्याला यष्टिचीत करता आले नाही. त्याच षटकात पंतने अॅलेक्स करीला जीवदान दिले. ''चाहत्यांना धोनीची आठवण होत आहे,'' असे Fox Sportsचे समालोचक वारंवार बोलत होते.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामहेंद्रसिंग धोनीरिषभ पंत