सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करताना टी-२० मालिका जिंकणे संस्मरणीय व विशेष असल्याची प्रतिक्रिया भारताचा वेगवान गोलंदाज टी. नटराजनने व्यक्त केली. तामिळनाडूच्या या २९ वर्षीय वेगवान गोलंदाजाने दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन महत्त्वाचे बळी घेतले. भारताने या लढतीत ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. नटराजनने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले, ‘माझा देशासाठी हा पहिला मालिका विजय आहे. संस्मरणीय व व विशेष.’ नटराजनने शॉर्ट व मोएजेस हेनरिक्स यांना बाद केले. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा नटराजनच्या कामगिरीमुळे प्रभावित झाला. तो भारतासाठी या दौऱ्याचा शोध असल्याचे मॅकग्राने म्हटले आहे. सिडनी मैदानावर दुसऱ्या लढतीच्यावेळी समालोचन करताना मॅकग्रा म्हणाला, ‘नटराजन कामगिरीत सातत्य राखेल, अशी आशा आहे.’