ठळक मुद्देऑस्ट्रेलियाला सलग पाच ट्वेंटी-20 सामन्यात पराभूत करण्याची संधी भारताने गमावलीपहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अवघ्या चार धावांनी विजयकुलदीप यादवची प्रभावी गोलंदाजी अन् विश्वविक्रम
ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाला सलग पाच ट्वेंटी-20 सामन्यात पराभूत करण्याची संधी भारतीय संघाने बुधवारी गमावली. पावसाच्या व्यत्ययात पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अवघ्या चार धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तरीही भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने या सामन्यात विश्वविक्रमाची नोंद केली. पहिल्या पंधरा ट्वेंटी-20 सामन्यांत सर्वात प्रभावी गोलंदाजाचा मान कुलदीपने पटकावला आहे.
तीन सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या लढतीत कुलदीपने 24 धावांत 2 विकेट घेतल्या. त्याने कांगारूंचा कर्णधार अॅरोन फिंच आणि ख्रिस लीन यांना बाद केले. ट्वेंटी-20तील 15 सामन्यांत 31 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसने पहिल्या 15 ट्वेंटी-20 सामन्यांत 27 विकेट घेतल्या होत्या. या विक्रमात भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल 27 विकेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानासाठी तीन गोलंदाजांमध्ये बरोबरी झाली आहे. यात पाकिस्तानचा उमर गुल, नेदरलँड्सचा अहसन मलिक आणि न्यूझीलंडचा इश सोधी ( प्रत्येकी 26) यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहीर व वेस्ट इंडिजचा केस्रीक विलियम्स ( प्रत्येकी 25) संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहे.
या सामन्यात भारताच्या जलदगती गोलंदाजांना फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचचा सोपा झेल सोडला. खलील अहमदने पहिले यश मिळवून दिले, परंतु तो महागडा ठरला. कुलदीपने 10.7च्या स्ट्राईक रेटने विकेट घेतल्या आहेत. अफगाणिस्तानच्या रशीद खाननंतर ही दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी आहे. रशीदने प्रत्येक दहा चेंडूनंतर विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.