Join us

India vs Australia : फिरोज शाह कोटलावरील आकडेवारी कोणाच्या बाजूनं, भारत की ऑस्ट्रेलिया?

India vs Australia : पाहुण्या ऑस्ट्रेलियानं चौथ्या वन डे सामन्यात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करताना पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 13:36 IST

Open in App

नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पाहुण्या ऑस्ट्रेलियानं चौथ्या वन डे सामन्यात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करताना पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. त्यामुळे नवी दिल्लीतील फिरोज शाह कोटला येथे होणाऱ्या पाचव्या वन डे सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचे स्वप्न दोन्ही संघ पाहात आहेत आणि त्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्नही करणार आहेत. पण, फिरोज शाह कोटला स्टेडियमचा इतिहास नेमका कोणाच्या बाजूनं आहे?

 शिखर धवनच्या 143 धावांची खेळी आणि रोहित शर्माची ( 95) त्याला मिळालेली साथ, याच्या जोरावर भारताने 358 धावांचा डोंगर उभा केला. मात्र, पाहुण्या ऑस्ट्रेलियाने भारताच्या विजयाच्या आशांवर पाणी फिरवले. ऑस्ट्रेलियाने चार विकेट्स राखून 47.5 षटकांतच विजयावर शिक्कामोर्तब केले. 350हून अधिक धावांचा डोंगर उभा करून भारताला विजय आपलाच असे वाटले होते, परंतु ऑस्ट्रेलियाने त्यांना पराभवाची चव चाखवली. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज अवघ्या 12 धावांवर माघारी परतले होते. मात्र, उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकोम्ब यांनी विक्रमी 192 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला विजयाचा मार्ग दाखवला. त्यानंतर अ‍ॅस्टन टर्नरने जोरदार फटकेबाजी करून ऑस्ट्रेलियाचा विजय पक्का केला. टर्नरने 43 चेंडूंत 84 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीत 5 खणखणीत षटकारांसह 6 चौकारांचा समावेश होता.

जवळपास दशकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ फिरोज शाह कोटलावर वन डे क्रिकेटमध्ये समोरासमोर येणार आहेत. ऑक्टोबर 2009 मध्ये उभय संघ शेवटचे या मैदानावर खेळले होते. फिरोज शाह कोटलावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार वन डे सामने झाले आहेत आणि त्यात भारताचे पारडे जड दिसत आहे. भारतीय संघाने चारपैकी तीन सामन्यांत विजय मिळवला असल्यानं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच याचे टेंशन वाढलं आहे. 

2 ऑक्टोबर 1986 मध्ये उभय संघ कोटलावर प्रथम भिडले होते आणि त्यात भारतानं तीन विकेट राखून विजय मिळवला होता. त्यानंतर 1987 मध्ये भारताने 56 धावांनी विजय मिळवला. 1998मध्ये ऑस्ट्रेलियानं 4 विकेटने विजय मिळवला होता. पण, 2009मध्ये भारताने पुन्हा 6 विकेट्स राखून विजय मिळवला. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीअ‍ॅरॉन फिंच