Join us  

India vs Australia : विराट कोहलीच्या गैरहजेरीत टीम इंडियाची खरी कसोटी; जाणून घेऊया कशी असेल पुढील व्युहरचना! 

पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांना त्यात धावांची भर घालायची होती. त्यासाठी कोणतीच घाई करण्याची किंवा उगाच संकट ओढावून घेणारे फटकेही मारायचे नव्हते. या दोन्ही गोष्टींवर भारतीय फलंदाज ठाम होते. मग नेमकं काय चुकलं?

By स्वदेश घाणेकर | Published: December 20, 2020 11:40 AM

Open in App
ठळक मुद्देभारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासूनडेव्हिड वॉर्नरच्या कमबॅकनं ऑस्ट्रेलिया संघ अधिक मजबूतअनुष्काच्या बाळंतपणासाठी विराट कोहली मायदेशी परतणार

- स्वदेश घाणेकर

वन डे मालिकेतील पराभव विसरून टीम इंडियानं ट्वेंटी-२० मालिकेत जबरदस्त कमबॅक केले आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुन्हा दम दाखवणार असल्याचे संकेत दिले. पण, पहिल्याच कसोटीत टीम इंडियाचा 'दम' निघाला आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज धापा टाकताना सर्वांना पाहिले. २०१८-१९च्या मालिकेतील ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी टीम इंडिया सज्ज होती. रोहित शर्मा, इशांत शर्मा यांची उणीव टीम इंडियाला जाणवेल हे स्पष्ट होतेच. पण, म्हणून भारतीय फलंदाज अशा प्रकारे शरणागती पत्करतील, असा विचारही कुणी केला नसावा. आता तर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) अनुष्का शर्माच्या ( Anushka Sharma) बाळंतपणासाठी मायदेशी परतणार आहे. त्यामुळे भारतासमोरील आव्हान अजून खडतर बनणार हे निश्चित...

पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांना त्यात धावांची भर घालायची होती. त्यासाठी कोणतीच घाई करण्याची किंवा उगाच संकट ओढावून घेणारे फटकेही मारायचे नव्हते. या दोन्ही गोष्टींवर भारतीय फलंदाज ठाम होते. मग नेमकं काय चुकलं? ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी लाईन-लेंथवर टिच्चून मारा केला आणि भारतीय फलंदाजांकडून चुका करून घेतल्या. भारताचा एकही फलंदाज चुकीचा फटका मारून बाद झाला नाही ( पृथ्वी शॉ अपवाद). पॅट कमिन्स व जोश हेझलवूड यांनी एकाच लाईन लेंथवर गोलंदाजी केली आणि त्याचे फळ इतक्या लवकर मिळेल याची अपेक्षा त्यांनीही केली नव्हती. हेझलवूडनं ८ धावांत ५ फलंदाज बाद केले. कमिन्सनं चार विकेट घेत त्याला तुल्यबळ साथ दिली. इनस्वींग - आऊटस्वींग चेंडूवर भारतीय फलंदाज चाचपडतात, हे सर्वांनाच माहित आहे. त्याचीच अमंलबजावणी कमिन्स व हेझलवूडनं केली. यष्टिंमागे पाच फलंदाज बाद झाले.

दुसरी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्नवर खेळवण्यात येणार आहे. त्यात टीम इंडियाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर असणार आहे. विराट पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी मायदेशात परतणार आहे. BCCIनं त्याची सुट्टी मान्य केली आहे. लाजीरवाण्या पराभवानंतर विराटनं टीम इंडिया आगामी सामन्यांतून कमबॅक करेल, असा विश्वास व्यक्त केला. पण, खरंच ते इतकं सोपं आहे का?रोहित शर्मा ( Rohit Sharma) ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे, परंतु तो १४ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत आहे. त्यामुळे विराटला पर्याय म्हणून रोहित असा विचार किमान दुसऱ्या कसोटीत करता येणार नाही. त्यात मोहम्मद शमी ( Mohammad Shami) याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे आणि त्यानं मालिकेतून माघार घेतली आहे. आधीच इशांत शर्मा व भुवनेश्वर कुमार या अनुभवी गोलंदाजांची उणीव जाणवत असताना शमीची माघार हा टीम इंडियासाठी मोठा हादरा आहे.  शमीला रिप्लेस म्हणून नवदीप सैनीचा विचार सुरू आहे, परंतु तो किती प्रभाव टाकेल हे काळच सांगेल.

विराटच्या अनुपस्थितीत भारताची फलंदाजी लुळी होईल, असा दावा त्याच्या चाहत्यांकडून केला जात आहे. पहिल्या डावात अजिंक्यच्या चुकीच्या कॉलमुळे विराट धावबाद झाला नसता, तर सामन्याचा निकाल भारताच्या बाजूनं असता, असाही दावा केला जात आहे. पण, विराटच्या त्या विकेटची भरपाई गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गुंडाळून केली होती. भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात माती खाल्ली... विराटच्या चाहत्यांनी हे सांगाव की दुसऱ्या डावात तो कुणामुळे बाद झाला? त्यामुळे विराट म्हणजे टीम इंडिया या भ्रमातून त्यांनी बाहेर पडावे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, हे त्यांनी विसरता कामा नये...

आता टीम इंडियासमोरील पर्याय काय?अजिंक्य रहाणे ( कर्णधार), मयांक अग्रवाल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, वृद्धीमान सहा, नवदीप सैनी, पृथ्वी शॉ, शुबमन गिल, हनुमा विहारी, उमेश यादव

असा असेल अंतिम ११ संघपृथ्वी शॉ पहिल्या कसोटीत अपयशी ठरल्यानंतर शुबमन गिलला संधी मिळणे अपेक्षित आहे. मयांक अग्रवालसह तो सलामीला खेळण्याची शक्यता अधिक आहे. मधल्या फळीत विराट कोहलीच्या जागी लोकेश राहुल हा सक्षम पर्याय आहे. त्याच्यासाथीला चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे ही जोडी... हनुमा विहारीनेही निराश केले आहे आणि त्यामुळे त्याच्याजागी रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू खेळवण्याचा विचार कर्णधार रहाणे नक्की करेल. जडेजा दुसऱ्या कसोटीसाठी फिट आहे. सहाच्या जागी रिषभ पंतचा पर्याय आहे, पण सहालाच संधी मिळण्याची शक्यता आहे. शमीच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळेल. 

दुसऱ्या कसोटीतील Playing XI - शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, वृद्धीमान सहा/रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीपृथ्वी शॉशुभमन गिलचेतेश्वर पुजाराअजिंक्य रहाणेमयांक अग्रवाललोकेश राहुलमोहम्मद शामीजसप्रित बुमराहरवींद्र जडेजाआर अश्विनरिषभ पंतवृद्धिमान साहा