Join us

India vs Australia : ऑस्ट्रेलियाच्या विजयपथामध्ये अडथळा, प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे माघारी

India vs Australia : ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारत दौऱ्यात विजयाने सुरुवात केली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 14:33 IST

Open in App

बंगळुरू, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताविरुद्धच्या घरच्या मालिकेत मानहानिकारक पराभव पत्करावा लागलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारत दौऱ्यात विजयाने सुरुवात केली. विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर भारताच्या तोंडचा घास पळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आणि आज बंगळुरू येथे होणाऱ्या सामन्यात त्यांना विजय मिळवून मालिका खिशात घालण्याची संधी आहे. 11 वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियाला भारतात ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याची संधी आहे. मात्र, त्यांच्या या विजयाच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. त्यांचा जलदगती गोलंदाज केन रिचर्डसन याला दुखापतीमुळे मायदेशी परतावे लागले आहे. 

पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यापूर्वी नेट मध्ये सराव करताना रिचर्डसनला दुखापत झाली होती. 28 वर्षीय रिचर्डसनने मंगळवारी ऑसी संघासोबत सराव केला, परंतु त्याने सराव अर्ध्यावर सोडला. '' रिचर्डसनला दुखापत झाली होती. दुर्दैवाने तो पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे त्याला मायदेशी परत जावे लागत आहे,'' अशी माहिती ऑस्ट्रेलिया संघाचे फिजिओ डेव्हिड बिक्ली यांनी दिली.अँड्य्रु टायला बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. टायने सात आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. त्याने बिग बॅश लीगमध्ये 14 सामन्यांत पर्थ स्कॉचर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना 17 विकेट्स घेतल्या आहेत.  

11 वर्षांत जे जमलं नाही ते ऑस्ट्रेलिया आज करून दाखवणार? आजच्या सामन्यात विजय मिळवून इतिहास घडवण्याची संधीही त्यांना आहे. अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघाला 11 वर्षांत प्रथमच भारताविरुद्ध ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि आज विजय मिळवल्यास त्यांचा 2007-08 नंतर भारताविरुद्धचा पहिला ट्वेंटी-20 मालिका विजय ठरेल. भारताविरुद्ध खेळलेल्या 20 ट्वेंटी-20 सामन्यांत ऑस्ट्रेलियाने 7 सामने जिंकले आहेत, तर दोन सामने अनिर्णीत सुटले आहेत. भारताला आज पराभव पत्करावा लागल्यास, त्यांचा हा ट्वेंटी-20 तील सलग तिसरा पराभव ठरेल. यापूर्वी 2015 मध्ये भारतीय संघाला सलग तीन ट्वेंटी-20 सामने गमवावे लागले होते.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया