नवी दिल्ली : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दिवस-रात्र कसोटीत विजय मिळवला नाही तर कोहलीच्या अनुपस्थितीत यजमान संघाला मालिकेत पराभूत करणे कठीण जाईल, असे मत भारताचे माजी कर्णधार व माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले. भारत १७ डिसेंबरपासून ॲडिलेडमध्ये दिवस-रात्र कसोटीसह बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेची सुरुवात करणार आहे. कुंबळे यांच्या मते ही लढत भारतासाठी मोठे आव्हान असेल. कर्णधार कोहली पहिल्या कसोटीनंतर पितृत्व रजेनिमित्त भारतात परतणार आहे.
कुंबळे पुढे म्हणाले,’जर आपण पहिला कसोटी सामना जिंकत आगेकूच केली तर टीम इंडियाकडे गेल्या दौऱ्याची पुनरावृत्ती करण्याची चांगली संधी राहील. स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर संघात पुनरागमन करीत आहे तरी विराट तीन कसोटी सामन्यांत खेळणार नसल्यामुळे भारतासाठी मोठे कारण ठरेल. तरी संघात क्षमता आहे. मत ती फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो.’
भारतीय खेळाडूंकडे अव्वल पातळीवर गुलाबी चेंडूने खेळण्याचा अधिक अनुभव नाही. संघाने केवळ एक सामना गुलाबी चेंडूने खेळला आहे. तो वर्षभरापूर्वी बांगलादेशविरुद्ध खेळला होता. त्यात भारताने एक डाव ४६ धावांनी विजय मिळविला होता. ऑस्ट्रेलिया संघाने मात्र गेल्या काही वर्षात दिवस-रात्रचे अनेक सामने खेळले आहेत.