नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पाचव्या वन डे सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अॅरोन फिंच आणि उस्मान ख्वाजा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर पीटर हँड्सकोम्बनं दुसऱ्या विकेटसाठी ख्वाजासह चांगली जोडी जमवली. ख्वाजानं या शतकी खेळी करत मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरीचे दर्शन घडवले. त्याने या कामगिरीसह भारतीय खेळपट्टींवर आपलं नाणं खणखणीत वाजवत एबी डिव्हिलियर्स आणि केन विलियम्सन या दिग्गज फलंदाजांना मागे टाकले.
उस्मान ख्वाजाने पाच सामन्यांच्या मालिकेत दुसरे शतक झळकावले. कोटला वन डे सामन्यात त्याने 102 चेंडूंत 2 षटकार व 10 चौकार खेचून 100 धावा केल्या. त्याने पहिल्या विकेटसाठी फिंचसह 76 धावांची भागीदारी केली. ही सेट जोडी रवींद्र जडेजाने फोडली. त्यानं 15व्या षटकात फिंचला त्रिफळाचीत केले. त्यानंतर ख्वाजा आणि हँड्सकोम्ब या जोडीनं भारतीय गोलंदाजांना हैराण केले. या खेळीसह ख्वाजानं भारतात पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान पटकावला.
ख्वाजानं शतकी खेळीनंतर मालिकेत 383 धावा करण्याचा पराक्रम केला. याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या
एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होता. त्याने 2015 च्या भारत दौऱ्यात 358 धावा केल्या होत्या. त्याआधी 1983 मध्ये गॉर्डन ग्रिनिज यांनी 353 धावा आणि 2009मध्ये तिलकरत्ने दिलशानने 353 धावा केल्या होत्या.
यासह त्यानं भारताविरुद्धच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचाही मान पटकावला. त्याने न्यूझीलंडच्या केन विलियम्सनचा 361 धावांचा विक्रम मोडला. 2014साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या मालिकेत केनने जोरदार फटकेबाजी केली होती.