Join us

India vs Australia 5th ODI : रोहित शर्मानं मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, आफ्रिकेचा आमलाही पिछाडीवर

India vs Australia 5th ODI : मालिका विजयासाठी महत्त्वाच्या या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 18:37 IST

Open in App

नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पाचव्या वन डे सामन्यात विजयासाठी भारताला 273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. मालिका विजयासाठी महत्त्वाच्या या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर शिखर धवन (12) त्वरित माघारी परतला. त्यामुळे भारतीय संघावर दडपण आले होते. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्सने भारताला पहिला धक्का दिला, परंतु त्यानंतर रोहित शर्मा व कर्णधार विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रोहितनं या सामन्यात 13वी धाव घेताच नावावर एक विक्रम नोंदवला, त्यानं या कामगिरीसह महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा हाशीम आमला यांचा विक्रम मोडत अव्वल स्थान पटकावले.

उस्मान ख्वाजा ( 100) आणि पीटर हँड्सकोम्ब ( 52) यांच्या फटकेबाजीनंतर अन्य फलंदाजांनी पत्करलेल्या हाराकिरीमुळे ऑस्ट्रेलियाला 9 बाद 272 धावाच करता आल्या. पाचव्या वन डे सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्यासाठी भारतासमोर 273 धावांचे लक्ष्य आहे. भारताच्या जसप्रीत बुमराने सर्वात प्रभावी गोलंदाजी करताना ऑसींच्या धावगतीवर चाप लगावला. पण, त्याच्या अखेरच्या दोन षटकांत ऑस्ट्रेलियाने ती कसर भरून काढली. भुवनेश्वर कुमारने तीन, तर रवींद्र जडेजा व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. कुलदीप यादव (74) सर्वात महागडा गोलंदाज ठरला.  

लक्ष्याचा पाठलाग करताना धवनने सुरुवात तर चांगली केली, परंतु पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. कमिन्सच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक अॅलेक्स करीच्या हाती झेल देत तो माघारी परतला. त्यानंतर रोहित व विराटने संयमी खेळ केला. रोहित वन डे क्रिकेटमध्ये 200 वा डाव खेळत आहे. या सामन्यात त्यानं सलामीवीर म्हणून सर्वात जलद 6000 धावांचा विक्रम नावावर केला. त्यानं 121 डावांत हा पल्ला गाठला. आमला आणि तेंडुलकर यांना हा पल्ला गाठण्यासाठी अनुक्रमे 123 व 133 डाव खेळावे लागले.

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासचिन तेंडुलकरहाशिम आमला