मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावली. युजवेंद्र चहलने रचलेल्या मजबूत पायावर धोनीने विजयी कळस चढवला. चहलने सहा विकेट घेतल्या. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात प्रथमच द्विदेशीय वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. फलंदाजांची कसोटी पाहणाऱ्या खेळपट्टीवर धोनीने एका बाजूने संयमी खेळ करताना भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचे 231 धावांचे माफक लक्ष्य भारताने 7 विकेट राखून सहज पार केले. धोनीने नाबाद 87 धावा केल्या. कर्णधार विराट कोहली ( 46) आणि केदार जाधव ( नाबाद 61 ) यांनीही विजयात हातभार लावला. भारताने 49.2 षटकांत 3 बाद 234 धावा केल्या.
भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने शुक्रवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर एकदम कडssssक परफॉर्मन्स दिला. त्याच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. चहलने 42 धावा देत 6 विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 230 धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियात वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा विकेट घेणारा तो भारताचा पहिला फिरकीपटू ठरला. ऑस्ट्रेलियाच्या पीटर हँड्सकोम्बने (58) खिंड लढवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला सहकाऱ्यांकडून हवीतशी साथ मिळाली नाही. उस्मान ख्वाजा ( 34) आणि शॉन मार्श ( 39) यांचे एकाच षटकात बाद होणे हे भारतासाठी खूपच फलदायी ठरले.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फार चांगली झाली नाही. हिटमॅन रोहित शर्मा अवघ्या 9 धावांवर माघारी परतला. शिखर धवन आणि कर्णधार
विराट कोहली मोठी भागीदारी करतील असे वाटत होते, परंतु मार्कस स्टोइनिसने त्याला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद करून माघारी पाठवले. महेंद्रसिंग धोनीला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले. कोहली आणि धोनी यांनी प्रत्येकी दोन जीवदान मिळाल्यानंतर संयमी खेळावर भर दिला. पण, त्यामुळे धावा आणि चेंडू यांच्यातील अंतर कमालीचे कमी होऊ लागले. कोहलीन 46 धावांवर बाद झाल्यानंतर धोनीने
केदार जाधवच्या साथीने अर्धशतकी भागीदारी केली. धोनीने सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक पूर्ण केले. जाधवनेही अर्धशतक पूर्ण केले.