मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाची कोंडी केली आहे. युजवेंद्र चहलच्या एका षटकाने सामन्याचे चित्रच बदलले. शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजा ही सेट जोडी चहलने तोडली. चहलच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंग धोनीनं मार्शला यष्टिचीत केले आणि स्वतःच्या नावावर विक्रमाची नोंद केली.
ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर 27 धावांवर माघारी परतल्यानंतर मार्श व ख्वाजा यांनी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला सुस्थितीत आणले. मात्र, चहलच्या एका षटकात दोघेही माघारी परतले. चहलच्या फिरकीचा अंदाज चुकल्याने मार्शला यष्टिचीत होऊन माघारी परतावे लागले. धोनीची ही यष्टिचीत विक्रमी ठरली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधित 17 यष्टिचीत करण्याचा विक्रम धोनीने नावावर केला.
वन डे क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक यष्टिचीत करणाऱ्या यष्टिरक्षकांमध्ये धोनी अव्वल स्थानावर आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध 24 स्टम्पिंग केले आहेत. त्यापाठापाठ श्रीलंकेच्या रमेक कालुविथरणाचा ( 22 वि. पाकिस्तान ) क्रमांक येतो. बांगलादेशचा मुश्फिकर रहीम ( 19 वि. झिम्बाब्वे), श्रीलंकेचा कुमार संगकारा ( 19 वि. दक्षिण आफ्रिका) यांचा क्रमांक येतो. धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 स्टम्पिंग करून स्वतःचाच विक्रम मोडला. त्याने इंग्लंडविरुद्ध 16 स्टम्पिंग केले आहेत.