Join us

बायको बाळासह पाहत होती सामना; सेंच्युरी झळकावताच Travis Head नं बॅटचा केला 'पाळणा'

जबरदस्त खेळीसह खास अंदाजात साजरी केली सेंच्युरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 14:31 IST

Open in App

अ‍ॅडिलेड कसोटी सामन्यात ट्रॅविस हेड टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला. गुलाबी चेंडूवर खेळवण्यात येणाऱ्या दिवस रात्र कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने दमदार शतक झळकावत भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडले. शतकी खेळीनंतर त्याचे सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरत आहे. बॅटचा पाळणा करत ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाजाने आपल्या नवजात बाळासाठी हे शतक समर्पित केले. एवढेच नाही तर या क्लास शतकी खेळीसह त्याने ऑस्ट्रेलियाचा दिवंगत क्रिकेटपटू फिल ह्युज यालाही श्रद्धांजली वाहिली.  

ट्रॅविस हेडनं १११ चेंडूत पूर्ण केलं शतक

नॅथन मॅकस्विनी आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या रुपात धक्क्यावर धक्के बसल्यावर ट्रॅविस मैदानात उतरला. पर्थ कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळून भारतीय संघातील गोलंदाजाला नडणाऱ्या या पठ्यानं यावेळी पुन्हा आपलं बस्तान बसवलं. १११ व्या चेंडूवर शतकी धाव घाताच त्याने ही खेळी आपल्या बाळाला समर्पित केली. यासाठी त्याने बॅटचा पाळणा करत सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.

बॉर्डर गावसकर स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच हेड दुसऱ्यांदा झाला होता बाबा

ट्रॅविस हेडला प्रोत्साहन देण्यासाठी त्याची पत्नी जेसिका बाळाला घेऊन स्टेडियमवर उपस्थितीत होती. अ‍ॅडिलेड हे ट्रॅविस हेडचं घरचं मैदान आहे. याच शहरात १५ एप्रिल २०२३ मध्ये ट्रॅविस हेड आणि जेसिका यांनी लग्न केले होते. लग्नाआधी २०२२ मध्ये बेबी गर्लचं स्वागत करणाऱ्या या जोडीनं बॉर्डर गावसकर ट्रॉफी आधीच आपल्या दुसऱ्या बाळाचं स्वागत केले होते.  ४ नोव्हेंबर २०२४ रोजी जेसिकानं आपल्या अपत्याला जन्म दिला. त्यांच्या या बेबी बॉयचं नाव हॅरिसन जॉर्ज असं आहे.