India vs Australia, 2nd Test : अॅडलेड कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर टीम इंडिया असा दमदार कमबॅक करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. त्यात कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला, दुखापतीमुळे मोहम्मद शमीनंही माघार घेतली होती. या खडतर परिस्थितीत अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) नेतृत्व कौशल्य दाखवले अन् ऑस्ट्रेलियाला सडेतोड उत्तर दिले. टीम इंडियानं बॉक्सिंग डे कसोटीत ८ विकेट राखून बाजी मारली आणि चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली.
भारताच्या १३१ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची दैना उडाली. दुसऱ्या डावात जो बर्न्स ( ४), स्टीव्हन स्मिथ ( ८), कर्णधार टीम पेन ( १) ही मंडळी एकेरी धाव करून बाद झाले. मॅथ्यू वेड ( ४०) व मार्नस लाबुशेन ( २८) यांनी काही काळ संघर्ष केला, परंतु या दोघांना अनुक्रमे
रवींद्र जडेजा व आर अश्विन यांनी तंबूत पाठवले. ६ बाद ९९ धावांवरून कमिन्स व ग्रीन या जोडीनं ऑस्ट्रेलियाला १५६ धावांपर्यंत नेले. या दोघांची ५७ धावांची भागीदारी चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात बुमराहनं संपुष्टात आणली. कमिन्स १०३ चेंडूंत २२ धावांवर माघारी परतला. दुसऱ्या बाजूनं ग्रीनचा संघर्ष सुरूच होता, परंतु सिराजनं ग्रीनला ( ४५) बाद करून ऑस्ट्रेलियाच्या उरलेल्या आशाही मावळून टाकल्या. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २०० धावा करता आल्यानं टीम इंडियासमोर विजयासाठी ७० धावांचे माफक लक्ष्य होते.
मयांक अग्रवाल ( ५) व चेतेश्वर पुजारा ( ३) झटपट माघारी परतल्यानंतर शुबमन गिल व अजिंक्य रहाणेनं संगाला विजय मिळवून दिला. अजिंक्यनं विजयी धाव घेतली. गिल ३५ धावांवर, तर अजिंक्य २७ धावांवर नाबाद राहिला. या विजयानंतर भारतीय संघाचे सर्वांनी कौतुक केलं. महान फलंदाज सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांनी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. तेंडुलकर म्हणाला,''विराट कोहली, रोहित शर्मा, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्याशिवाय विजय मिळवला, म्हणजे हे खूप मोठं यश आहे. ०-१ अशा पिछाडीनंतर टीम इंडियानं दाखवलेल्या लढाऊ वृत्तीचे कौतुक.''
विराटनं ट्विट केलं की,''संघातील प्रत्येक खेळाडूनं विजयासाठी स्वतःला झोकून दिले. टीमसाठी आणि विशेषतः अजिंक्यसाठी खूप आनंद होत आहे. त्यानं संघाचे नेतृत्व खंबीरपणे सांभाळले.''