बंगळुरु, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मंगळवारी पहाटे भारतीय हवाई दलाने देशवासीयांना आनंदाची बातमी दिली. भारतीय हवाई दलाने मंगळवारी पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर सर्जिकल स्ट्राईक करताना दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले. बालोकेट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने 1000 किलो वजनाची स्फोटके टाकून हा बॉम्बहल्ला केला. त्यात जवळपास 300 हून अधिक दहशतवादी ठार झाले. हवाई दलाच्या या शौर्यानंतर देशभरातच नव्हे तर भारतीय क्रिकेट संघातही जोशपूर्ण वातावरण आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या चमूतही हेच वातावरण पाहायला मिळत आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सामना आज बंगळुरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ 0-1 असा पिछाडीवर आहे आणि मालिका पराभव टाळण्यासाठी भारताला आज विजय मिळवावा लागेल. त्यामुळे सहकाऱ्यांना सज्ज करण्यासाठी कर्णधार विराट कोहलीनं फेसबुक पोस्ट केली आहे आणि त्यात त्यानं सहकाऱ्यांना How's the Josh? असे विचारले आहे.
12 दिवसांपूर्वी जैशे-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं पुलवामा येथे केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्याला चोख प्रत्युत्तर देताना भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये लपलेल्या 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर उरी चित्रपटातील How's the Josh? या संवादाची पुन्हा सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. कोहलीही सहकाऱ्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
शिखर धवन की विजय शंकर; आजच्या सामन्यात कशी असेल रणनीती? विशाखापट्टणम येथे झालेल्या रोमहर्षक सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आणि दोन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. उभय संघांत आज बंगळुरू येथे दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला नाचक्की टाळण्यासाठी, तर ऑस्ट्रेलियाला इतिहास रचण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यातून कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल आणि उमेश यादव यांनी संघांत पुनरागमन केले. लोकेशच्या समावेशामुळे नियमित सलामीवीर शिखर धवनला बसवण्यात आले होते. राहुलनेही खणखणीत अर्धशतक झळकावत झोकात पुनरागमन केले. पण उमेशला अपयश आले आणि कोहलीला (२४) मोठी खेळी करता आली नाही. हार्दिक पांड्याने दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आणि पहिल्या सामन्यात त्याची उणीव जाणवली. भारताकडे जलद मारा करणारा तिसरा पर्यायच नव्हता. अशा परिस्थितीत अष्टपैलू विजय शंकरचा आजच्या सामन्यात समावेश होऊ शकतो.
दिनेश कार्तिक व रिषभ पंत यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाला आज बाकावर बसावे लागू शकते. या सामन्यात धवन पुनरागमन करू शकतो. रोहित शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते. गोलंदाजीत उमेशच्या जागी सिध्दार्थ कौल संघात खेळू शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघ पाच फलंदाज, दोन जलदगती, तीन फिरकीपटू व एक अष्टपैलू अशा सह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. बंगळुरूची खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे.