बंगळुरू, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली रागीट आहे, त्याच्या तोंडात सतत शिव्या असतात, तो हट्टी आहे, असे मत अनेकजण व्यक्त करतात. त्याच्या कृतीमुळे त्याच्याबद्दलचे हे मत बनले असावे. पण तो तितकाच भावनिक आणि हळवा आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारत व ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी कोहलीला प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन करताना सर्वांनी पाहिले.
त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे आणि त्यात तो सुरक्षारक्षक फैजल खानचा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत कोहली वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे गाण गात आहे. त्याशिवाय त्याने केकचा तुकडा कापून स्वतः फैजलला भरवला. कोहलीच्या या शुभेच्छांनी फैजलही भारावून गेला होता.
न्यूझीलंड मालिकेतील विश्रांतीनंतर कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले. मात्र त्याला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर विजय खेचूव आणला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कोहलीला १७ चेंडूंत २४ धावा करता आल्या. ॲडम झम्पाने त्याला बाद केले.
याच सामन्यातून पुनरागमन करणाऱ्या लोकेश राहुलने (३६ चेंडूंत ५० धावा) अर्धशतक झळकावले. महेंद्रसिंग धोनीनेही ३७ धावांची खेळी केली, परंतु तो पुन्हा संथ खेळीमुळे टीकेचा धनी बनला. त्यामुळे आज बंगळुरू येथे होणा सामन्यात भारतीय संघावर मालिका पराभवाची नामुष्की टाळण्याचे आव्हान आहे.
शिखर धवन की विजय शंकर; आजच्या सामन्यात कशी असेल रणनीती?
पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यातून कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल आणि उमेश यादव यांनी संघांत पुनरागमन केले. लोकेशच्या समावेशामुळे नियमित सलामीवीर शिखर धवनला बसवण्यात आले होते. राहुलनेही खणखणीत अर्धशतक झळकावत झोकात पुनरागमन केले. पण उमेशला अपयश आले आणि कोहलीला (२४) मोठी खेळी करता आली नाही. हार्दिक पांड्याने दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आणि पहिल्या सामन्यात त्याची उणीव जाणवली. भारताकडे जलद मारा करणारा तिसरा पर्यायच नव्हता. अशा परिस्थितीत अष्टपैलू विजय शंकरचा आजच्या सामन्यात समावेश होऊ शकतो. विजयने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ८४ धावा केल्या होत्या.
असा असेल संघ - लोकेश राहुल, रोहित शर्मा / शिखर धवन, विराट कोहली रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, विजय शंकर, कृणाल पांड्या, सिध्दार्थ कौल, युजवेंद्र चहल, मयांक मार्कंडे, जसप्रीत बुमराह.