Join us

India vs Australia 2nd T20 : शिखर धवन की विजय शंकर; आजच्या सामन्यात कशी असेल रणनीती? 

India vs Australia 2nd T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज बंगळुरू येथे दुसरा सामना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 08:44 IST

Open in App

बंगळुरू, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विशाखापट्टणम येथे झालेल्या रोमहर्षक सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. १२७ धावांचे माफक लक्ष्य पार करताना भारतीय गोलंदाजांनी कांगारूंचा घाम काढला. पण अखेरच्या षटकात ऑसींनी तीन विकेट्स राखून बाजी मारली आणि दोन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. उभय संघांत आज बंगळुरू येथे दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला नाचक्की टाळण्यासाठी, तर ऑस्ट्रेलियाला इतिहास रचण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यातून कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल आणि उमेश यादव यांनी संघांत पुनरागमन केले. लोकेशच्या समावेशामुळे नियमित सलामीवीर शिखर धवनला बसवण्यात आले होते. राहुलनेही खणखणीत अर्धशतक झळकावत झोकात पुनरागमन केले. पण उमेशला अपयश आले आणि कोहलीला (२४) मोठी खेळी करता आली नाही. हार्दिक पांड्याने दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आणि पहिल्या सामन्यात त्याची उणीव जाणवली. भारताकडे जलद मारा करणारा तिसरा पर्यायच नव्हता. अशा परिस्थितीत अष्टपैलू विजय शंकरचा आजच्या सामन्यात समावेश होऊ शकतो. विजयने  न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ८४ धावा केल्या होत्या. दिनेश कार्तिक व रिषभ पंत यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाला आज बाकावर बसावे लागू शकते. या सामन्यात धवन पुनरागमन करू शकतो. २०१९ मध्ये खेळलेल्या ८ वन डे सामन्यांत धवनने २४३ धावा केल्या आहेत. धवनच्या समावेशामुळे  रोहित शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते. गोलंदाजीत उमेशच्या जागी सिध्दार्थ कौल संघात खेळू शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघ पाच फलंदाज, दोन जलदगती, तीन फिरकीपटू व एक अष्टपैलू अशा सह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. बंगळुरूची खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. असा असेल संघ लोकेश राहुल, रोहित शर्मा / शिखर धवन, विराट कोहली रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, विजय शंकर, कृणाल पांड्या, सिध्दार्थ कौल, युजवेंद्र चहल, मयांक मार्कंडे, जसप्रीत बुमराह.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीशिखर धवनरोहित शर्मामहेंद्रसिंह धोनी