Join us
Daily Top 2Weekly Top 5

धोनी पर्व संपलं?; टी-२०च्या 'रनसंग्रामात' यापुढे माही दिसणार नाही?

अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय संघ कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला विजयाने निरोप देण्यात अपयशी ठरला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 11:26 IST

Open in App

बंगळुरू, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय संघ कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला विजयाने निरोप देण्यात अपयशी ठरला...ऑस्ट्रेलियाने 7 विकेट राखून भारताला पराभूत केले आणि मालिका 2-0 अशी खिशात घातली... पण, अखेरच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यात धोनीनं चाहत्यांना निराश केलं नाही, त्यानं 23 चेंडूंत 40 धावांची खेळी केली आणि त्यात 3 षटकार व 3 चौकारांचा समावेश होता... मैदानावर त्याचे आगमन होताना आणि बाद झाल्यानंतर तो पेव्हेलियनमध्ये परतताना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे आभार मानले... जरा थांबा अधिकृतरित्या धोनीचा हा अखेरचा ट्वेंटी-20 सामना नव्हता, परंतु आगामी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी निवृत्त होणार अशी चर्चा आहे. तसे झाल्यास बंगळुरू येथे बुधवारी झालेला सामना हा धोनीचा अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना ठरू शकतो. भारताचा माजी कर्णधार धोनीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात बुधवारी एका विक्रमाला गवसणी घातली. त्यानं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 350 षटकार खेचण्याचा विक्रम नावावर केला आणि अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. भारताच्या 4 बाद 190 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 113 धावा चोपल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 19.4 षटकांत 3 बाद 194 धावा करत मालिका 2-0 अशी जिंकली. 

रिषभ पंत बाद झाल्यानंतर धोनी मैदानावर उतरला त्यावेळी चाहत्यांनी धोनीच्या नावाच गजरच केला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमनवर धोनीची बॅट चांगलीच तळपली आहे. त्यामुळे येथील चाहत्यांचा तो फेव्हरिट राहिला आहे. भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत आता एकही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना खेळणार नाही. त्यात धोनीनं वर्ल्ड कपनंतर निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यास, हा त्याचा अखेरच्या सामना ठरू शकतो, याची कल्पना चाहत्यांना होती. म्हणूनच त्यांनी धोनीचं मोठ्या उत्साहात स्वागत केले.  धोनीनंही या सामन्यात 40 धावांची खेळी केली. पहिल्या सामन्यातील संथ खेळीमुळे त्याच्यावर भरपूर टीका झाली आणि टीका करणाऱ्या सर्वांना धोनीनं बुधवारी उत्तर दिले. धोनीनं 526 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 352 षटकार खेचले आहेत आणि सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांमध्ये तो पाचव्या स्थानावर आहे. या क्रमवारीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल ( 506) आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ शाहिद आफ्रिदी, ब्रेंडन मॅकलम आणि सनथ जयसूर्या यांचा क्रमांक येतो.

 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय