Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS 1st Test : अन् पुजाराची अविस्मरणीय खेळी अशी संपुष्टात आली!

India vs Australia 1st Test :  मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने अॅडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाची लाज राखली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 14:49 IST

Open in App
ठळक मुद्देचेतेश्वर पुजाराने पहिल्या दिवशी भारतीय संघाची लाज राखलीपुजाराच्या 246 चेंडूंत 7 चौकार व दोन षटकार खेचून 123 धावाभारताच्या दिवसअखेर 9 बाद 250 धावा

अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने अॅडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाची लाज राखली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पुजाराने 246 चेंडूंत 7 चौकार व दोन षटकार खेचून 123 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर 9 बाद 250 धावा केल्या. पुजाराची ही अविस्मरणीय खेळी पॅट कमिन्सच्या चपळ क्षेत्ररक्षणाने संपुष्टात आणली. 88 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पुजारा धावबाद होऊन माघारी परतला आणि पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपल्याचे जाहीर केले. पुजाराला बाद करून कमिन्सने भारतीय चाहत्यांचा रोष ओढावून घेतला असला तरी त्याच्या चपळतेचे तितकेच कौतुकही केले जात आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या संघाने क्षेत्ररक्षणाचे उत्तम प्रदर्शन दाखवताना भारताचे दोन मुख्य मोहोरे टिपले. सुरुवातीला पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर भारताच्या कर्णधार विराट कोहलीचा अप्रतिम झेल टिपून उस्मान ख्वाजाने दाद मिळवली. कमिन्सच्या गोलंदाजीवर ड्राईव्ह लगावण्याचा कोहलीने प्रयत्न केला आणि चेंडू हवेत राहिला. ख्वाजाने डावीकडे स्वतःला झोकून देत एका हाताने तो चेंडू टिपला आणि भारताला तिसरा धक्का दिला. त्यानंतर पुजाराने संघाची जबाबदारी खांद्यावर घेतली. पण दिवसाच्या 88व्या षटकात त्याची ही अविस्मरणीय खेळी संपुष्टात आली. मिड ऑनवर उभ्या असलेल्या कमिन्सने अचुक निशाणा साधत चेंडू यष्टिंच्या दिशेने भिरकावला. कमिन्सच्या बाजूने एकच यष्टि दिसत होती आणि त्यातही त्याने उत्तम क्षेत्ररक्षण करताना पुजाराला बाद केले. कमिन्सच्या या क्षेत्ररक्षणाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे..

टॅग्स :चेतेश्वर पुजाराभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय