सिडनी : ‘निवृत्तीनंतर मी काय करेन हे आता सांगता येणार नाही, पण निवृत्तीनंतर मी पुन्हा बॅट हातात घेईन असे वाटत नाही. ज्या क्षणी मी निवृत्त होईन तो माझ्या कारकिर्दीचा अखेरचा दिवस असेल, पुन्हा क्रिकेटमध्ये येणार नाही,’ या शब्दात विराट कोहलीने निवृत्तीनंतर पुन्हा खेळणार का, या प्रश्नावर आपली बाजू स्पष्ट केली.
निवृत्ती घेणारे अनेक क्रिकेटपटू जगभरात होणाऱ्या टी२० लीगमध्ये खेळतच असतात, विराटने मात्र निवृत्तीनंतर न खेळण्याचा निर्धार बोलून दाखविला. भारतीय संघाने आॅस्ट्रेलियाला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पराभूत केले. आॅस्ट्रेलियाच्या भूमीत कसोटी मालिका जिंकणारा विराट पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर आॅस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळशील का या प्रश्नावर कोहली म्हणाला, ‘माझ्याबद्दल बोलायचे झाले, तर मी प्रचंड क्रिकेट खेळलो आहे. मी खेळणे थांबवेन तेव्हा माझ्यातील ऊर्जा संपलेली असल्यानेच क्रिकेटला अलविदा करेन. त्यामुळे निवृत्तीनंतर कुठल्याही लीगमध्ये खेळण्याचा प्रश्नच नाही.’