ठळक मुद्देऑस्ट्रेलियाचा पहिल्या वन डेत विजयरोहित शर्माची शतकी खेळी व्यर्थ289 धावांचा पाठलाग करण्यात भारतीय संघ अपयशी
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : आघाडीच्या फलंदाजांचे अपयश भारतीय संघाच्या पराभवाला कारणीभूत ठरले. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 289 धावांचा पाठलाग करताना भारताचे तीन फलंदाज 4 धावांवर माघारी परतले. रोहित शर्मा ( 133) आणि महेंद्रसिंग धोनी ( 51) यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. मात्र, धावा आणि चेंडू यांच्यातील फरक इतके वाढले की भारताचा विजय दूरावला. मात्र, रोहित खेळपट्टीवर असेपर्यंत भारतीयांना विजयाच्या आशा होत्या. 46व्या षटकांत तो माघारी परतला आणि भारताचा पराभव निश्चित झाला. ऑस्ट्रेलियाने 34 धावांनी सामना जिंकला.
उस्मान ख्वाजा (59), शॉन मार्श (54) आणि पीटर हँड्सकोम्ब (73) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डे भारतासमोर 289 धावांचे आव्हान ठेवले आहे. मार्कस स्टोइनिसने ( नाबाद 47) अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना ऑस्ट्रेलियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. भुवनेश्वर कुमार व कुलदीप यादव यांना प्रत्येकी दोन बळी. ऑस्ट्रेलियाने 5 बाद 288 धावा केल्या.
शिखर धवन, अंबाती रायुडू आणि कोहली हे अवघ्या 4 धावांवर माघारी परतले. त्यानंतर रोहित व धोनीने सामन्याची सूत्र हाती घेत सुरुवातीला संयमी आणि खेळपट्टीवर टिकल्यानंतर आक्रमक खेळ केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी करताना भारताच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या. रोहित आणि धोनी यांनी अर्धशतकी खेळी केली. धोनी 51 धावांवर माघारी परतल्यानंतर रोहितने खिंड लढवली. मात्र, 46व्या षटकात तो बाद झाला. रोहितने 129 चेंडूंत 10 चौकार व 6 षटकारांसह 133 धावांची खेळी केली. भारताला 50 षटकांत 9 बाद 254 धावा करता आल्या.