ठळक मुद्देभारताचा ऑस्ट्रेलियावर 34 धावांनी विजयतीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडीरोहित शर्माची झुंज अपयशी, धोनीचेही अर्धशतक व्यर्थ
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : सांघिक कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या वन डे सामन्यात भारतावर 34 धावांनी विजय साजरा केला. उस्मान ख्वाजा (59), शॉन मार्श (54) आणि पीटर हँड्सकोम्ब (73) यांच्या अर्धशतकांनंतर झाय रिचर्डसन याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कांगारूंनी हा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या 288 धावांचा पाठलाग करताना भारताला 254 धावांपर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुणालाही न जमलेला पराक्रम करून दाखवला.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 288 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचे शिखर धवन, अंबाती रायुडू आणि कोहली हे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या 4 धावांवर माघारी परतले. त्यानंतर रोहित व धोनीने सामन्याची सूत्र हाती घेत सुरुवातीला संयमी आणि खेळपट्टीवर टिकल्यानंतर आक्रमक खेळ केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली. धोनी 51 धावांवर माघारी परतल्यानंतर रोहितने खिंड लढवली. मात्र, 46व्या षटकात तो बाद झाला. रोहितने 129 चेंडूंत 10 चौकार व 6 षटकारांसह 133 धावांची खेळी केली. भारताला 50 षटकांत 9 बाद 254 धावा करता आल्या.
ऑस्ट्रेलियाचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 1000 वा विजय ठरला. अशी कामगिरी आतापर्यंत कोणत्याही संघाला करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाचा वन डेतील हा 558 वा विजय आहे. याशिवाय त्यांनी कसोटीच 384 आणि ट्वेंटी-20त 58 विजय मिळवले आहेत.