ठळक मुद्देविराट कोहलीने ट्वेंटी-20 क्रिकेट फॉरमॅटमध्ये विश्वविक्रमाची नोंद केलीतिसऱ्या सामन्यात त्याने नाबाद 61 धावा करताना केला पराक्रमन्यूझीलंडच्या मार्टिन गुप्तीलचा विक्रम मोडला
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने रविवारी ट्वेंटी-20 क्रिकेट फॉरमॅटमध्ये विश्वविक्रमाची नोंद केली. त्याने नाबाद 61 धावांची खेळी साकारताना भारताला यजमान ऑस्ट्रेलियावर 6 विकेट राखून विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका 1-1 अशा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कोहलीने 41 चेंडूंत नाबाद 61 धावा केल्या. यासह एका संघाविरुद्घ ट्वेंटी-20त सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम त्याने नावावर केला. यासह त्याने न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्तीलचा विक्रम मोडला.
करो वा मरो अशा सामन्यात कृणाल पांड्याने चार विकेट घेत भारताच्या विजयाचा पाया रचला. त्याने ऑस्ट्रेलियाला 164 धावांवर रोखले. लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी 67 धावांची भागीदारी करताना भारताला दमदार सुरुवात करून दिली. मात्र, मायकेल स्टार्स आणि अॅडम झम्पा यांनी दोघांना माघारी धाडले. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाने लोकेश राहुल व रिषभ पंत यांनाही त्वरित बाद केले, परंतु कोहली व दिनेश कार्तिक यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी 19.4 षटकांत भारताच्या विजयावर शिक्कामार्तब केले.
कोहलीने नाबाद 61 धावा करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 13 डावांत 488 धावा करण्याचा पराक्रम केला. यामध्ये त्याने पाच अर्धशतकं झळकावली. ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध जास्त धावा करण्याचा विक्रम कोहलीने नावावर केला. याआधी हा विक्रम गुप्तीलच्या नावावर होता. त्याने पाकिस्तानविरुद्ध 463 धावा केल्या होत्या. कोहलीने याचबरोबर भारताचा मालिका पराभवही टाळला.