ठळक मुद्देभारताने 2-1 अशा फरकाने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत केलेऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करणारा पाचवा संघ
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णीत राहिला आणि भारताने कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली. याबरोबरच भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका जिंकणारा भारता पाचवा संघ ठरला आहे. याआधी हा पराक्रम इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघानी केला आहे.
भारतीय संघाने ॲडलेड व मेलबर्न कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. सिडनी कसोटीत भारताने पहिल्या डावातच 622 धावांचा डोंगर उभा केला.
चेतेश्वर पुजारा ( 193 ) आणि रिषभ पंत ( 159* ) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला. ऑसींकडून दर्जेदार खेळ झाला नाही. त्यांचा पहिला डाव 300 धावांवर गडगडला. कुलदीप यादवने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देत आपला मालिका विजय पक्का केला. चौथ्या दिवशी बिनबाद 6 धावांवर असताना खेळ थांबला. सोमवारी पाऊस कायम राहिल्याने खेळ झाला नाही.
भारताची ऑस्ट्रेलियन भूमीतील ही 12 वी कसोटी मालिका होती. मागील 11 कसोटी मालिकांमध्ये भारताला 8 वेळा पराभव स्वीकारावा लागला, तर 3 मालिकांमध्ये बरोबरी केली होती. इंग्लंडने ऑस्ट्रेलियामध्ये 42 कसोटी मालिकांपैकी 14 मालिका जिंकल्या आहेत. न्यूझीलंडने 12 मालिकांपैकी 1 मालिका, तर दक्षिण आफ्रिकेने 11पैकी 3 मालिका जिंकल्या आहेत. तसेच विंडीजने 15 पैकी 4 कसोटी मालिका जिंकल्या आहेत.