Join us

Ind vs Aus 3rd test live : पहिल्याच षटकात रोहित शर्मा दोनवेळा बाद झाला अन्...; ऑस्ट्रेलियाला 'चूक' पडली महागात 

India vs Australia 3rd test live score updates  : भारतीय संघ बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीत  घरच्या मैदानावर सलग १६ व्या मालिका विजयाच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 09:48 IST

Open in App

India vs Australia 3rd test live score updates  : भारतीय संघ बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीत  घरच्या मैदानावर सलग १६ व्या मालिका विजयाच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे. भारतीय संघाने पहिल्या दोन्ही कसोटी तीन दिवसांच्या आत जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मिचेल स्टार्क व कॅमेरून ग्रीन हे दोन तगडे खेळाडू आज संघात परतले आहेत आणि पॅक कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ संघाचे नेतृत्व करतोय. स्टार्कच्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्मा ( Rohit Sharma) बाद होता, परंतु तो मैदानावरच उभा राहिला. त्यानंतर चौथ्या चेंडूवरही त्याची विकेट पडलेली, परंतु... 

या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाच्या डावखुऱ्या फलंदाजांनी निराश केले आहे. त्यांनी ११.५२च्या सरासरीने २४२ धावा केल्या आहेत आणि २१ वेळा विकेट फेकल्या आहेत. त्याउलट भारताच्या डावखुऱ्या फलंदाजांनी ६३.५०च्या सरासरीने २५४ धावा केल्या आहेत. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी येथे झालेल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांचेच पारडे जड राहिले आहे. अपेक्षित लोकेश राहुलला बाकावर बसवले गेले असून शुभमन गिलची एन्ट्री झाली आहे. मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली असून उमेश यादव आज खेळणार आहे. 

मिचेल स्टार्कने दमदार सुरुवात केली. त्याने टाकलेला पहिलाच चेंडू रोहितच्या बॅटला लागून यष्टीरक्षक अॅलेक्स केरीच्या हाती विसावला. जोरदार अपील झाले, परंतु अम्पायर नीतिन मेनन यांनी नाबाद दिले. DRS घेण्याची संधी कर्णधार स्मिथकडे होती, परंतु यष्टिरक्षक व गोलंदाज यांना गॅरंटी नसल्याने त्याने DRS घेतला नाही. पण, त्यानंतर रिप्लेमध्ये चेंडू व बॅट यांच्यात संपर्क झाल्याचे स्पष्ट दिसले अन् ऑस्ट्रेलियाच्या मॅनेजमेंटने डोक्यावर हात मारला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर रोहितसाठी LBW ची अपील झाली. स्टार्कचा चेंडू भन्नाट वेगाने रोहितच्या बॅटला चकवून पॅडवर आदळला. पण, तो आधी बॅटला आदळला असेल असा अंदाज घेत ऑस्ट्रेलियाने DRS नाही घेतला. यातही रिप्लेमध्ये रोहित बाद असल्याचे स्पष्ट दिसत होते. पहिल्या षटकात दोन वेळा बाद असूनही रोहितला कांगारूंच्या चुकीमुळे जीवदान मिळालेय. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्मास्टीव्हन स्मिथ
Open in App