ठळक मुद्देभारताच्या पहिल्या दिवसअखेर 9 बाद 250 धावाचेतेश्वर पुजाराने खिंड लढवलीकसोटीतील 16वे शतक आणि 5000 धावांचा पल्ला ओलांडला
अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : निराशाजनक सुरुवातीनंतर भारतीय संघ पहिल्या डावात अडचणीत सापडला होता. ऑस्ट्रेलियाचा संघ पाहुण्यांना झटपट गुंडाळेल असे वाटत होते. मात्र, मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने वैयक्तिक शतकी खेळीसह सहकाऱ्यांसोबत केलेल्या छोटेखानी भागीदारींमुळे भारताने सामन्यात कमबॅक केले. पुजाराच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर 9 बाद 250 धावा केल्या. पुजाराने कसोटी कारकिर्दीतील 16 वे शतक पूर्ण करताना 5000 धावांचा टप्पाही ओलांडला. सामन्याच्या 88 व्या षटकात पुजाराची बहारदार खेळी संपुष्टात आली. पॅट कमिन्सने त्याला धावबाद केले. पुजाराने 246 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 123 धावा केल्या.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लोकेश राहुल बाद झाला. त्यापाठोपाठ मुरली विजयही ( 11) माघारी परतला. कर्णधार कोहली आणि
चेतेश्वर पुजारा भारताचा डाव सांभाळतील असे वाटत होते. कोहलीकडून सर्वांना बऱ्याच अपेक्षा होत्या, परंतु पॅट कमिन्सच्या त्या षटकात तो बाद झाला आणि भारताची अडचण वाढली. कमिन्सच्या गोलंदाजीवर ड्राईव्ह लगावण्याचा कोहलीने प्रयत्न केला आणि चेंडू हवेत राहिला. ख्वाजाने डावीकडे स्वतःला झोकून देत एका हाताने तो चेंडू टिपला आणि भारताला तिसरा धक्का दिला. त्यानंतर अजिंक्य रहाणेही फार काळ मैदानावर जम बसवू शकला नाही.
4 बाद 41 अशा अवस्थेत असताना पुजारा आणि रोहित शर्मा या जोडीने संघाच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 45 धावांची भागादारी केली. निराशाजनक सुरुवातीनंतर पुजारा आणि कसोटी संघात पुनरागमन करणारा रोहित भारताचा डाव सांभाळेल असे वाटत होते. पण, रोहितचा एक चुकीचा फटका महागात पडला आणि सोशल मीडियावर त्याची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली.
पुजारा मात्र एका बाजूने संघर्ष करत होता. त्याने संयमी खेळ करताना अर्धशतक पूर्ण केले. त्याला रिषभ पंत आणि आर अश्विन यांच्याकडून साजेशी साथ मिळाली. पुजारा आणि पंत या जोडीने सहाव्या विकेटसाठी 41, तर पुजारा आणि अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. पंत व अश्विन माघारी परतल्यानंतर पुजाराने सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत संघाला दोनशे धावांचा पल्ला ओलांडून दिला. त्याने या दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा पल्लाही ओलांडला. त्याने दिवसअखेरपर्यंत खिंड लढवली.