चेन्नई : भारतावर २२७ धावांनी नोंदविलेल्या कसोटी विजयात इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स ॲन्डरसनचा मारा निर्णायक ठरला. त्याने पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात रिव्हर्स स्विंगच्या बळावर भारताीय फलंदाजांना गुंगारा दिला.झटपट तीन फलंदाजांना माघारी धाडल्यामुळे भारतीय संघ ५८.१ षटकात १९२ धावात गारद झाला.‘येथे चेंडू चांगला रिव्हर्स स्विंग होत होता. अचूक टप्पा टाकण्यो आव्हान होते. त्यात मी यशस्वी ठरलो.येथे चेंडूच्या उसळीबाबत मी भाग्यवान राहिलो. खेळपट्टी मंद होती आणि भेगाही होत्या, पण सकाळच्या हवेत चेंडूत हालचाल असल्यामुळे माझ्या रिव्हर्स स्विंग पुढे फलंदाज नमले,’ असे १५८ कसोटीत ६११ बळी घेणाऱ्या ३८ वर्षांच्या ॲन्डरसनने सांगितले.
भारतात केले तीन विक्रम
१९९० पासून भारतात आलेल्या परदेशी खेळाडूंपैकी सर्वाधिक विजेतेपदे मिळवणाऱ्या संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ॲन्डरसनने स्थान मिळवले. १९९० पासून मार्क बाऊचर, शेन वॉर्न आणि जॅक कॅलीस या तिघांनी भारतीय भूमीवर चार-चार कसोटी सामने जिंकले. तोच पराक्रम आज ॲन्डरसनने केला.
आशिया उपखंडात जेम्स ॲन्डरसनचा हा आठवा कसोटी विजय ठरला. इंग्लंडच्या इतर कोणत्याही खेळाडूला आशियामध्ये इतके विजय अनुभवता आलेले नाहीत.
३८ वर्षे आणि १९४ दिवस इतके वय असलेला ॲन्डरसन हा भारताच्या भूमीवर १९८३ नंतर कसोटी विजय अनुभवलेला पाहुण्या संघाचा सर्वात वयस्क खेळाडू ठरला. या आधी १९८३ साली क्लाइव्ह लॉइड यांनी १९८३ साली भारतात विजय मिळवणाऱ्या पाहुण्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी त्यांचे वय ३९ वर्षांपेक्षा अधिक होते.