India Tour of Sri Lanka : भारत-श्रीलंका वन डे मालिकेला १३ जुलैपासून सुरूवात होणार आहे, परंतु या मालिकेमागची संकटं वाढत चालली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाशी सुरू असलेला वाद मिटतोच तर लगेच लंकन संघाच्या फलंदाजी प्रशिक्षक ग्रँड फ्लॉवर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त येऊन धडकले आहे. ( Sri Lanka batting coach Grant Flower has tested positive for Covid-19). श्रीलंकेचे खेळाडू नुकतेच इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशी परतले. इंग्लंडच्या ३ खेळाडूंसह सात जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे संपूर्ण संघाला विलगिकरणात जावे लागले. त्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंचीही कोरोना चाचणी घेतली गेली अन् त्यात फ्लॉवर यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
PCR चाचणीत ग्रँड फ्लॉवर यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यांच्या कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत आहेत, असे श्रीलंका क्रिकेट बोर्डानं त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे. श्रीलंकेचे खेळाडू मंगळवारी मायदेशात परतले आणि त्यांची चाचणी झाली. हे सर्व खेळाडू ७ दिवसांच्या विलगिकरणात आहेत. फ्लॉवर यांना इतर खेळाडूंपेक्षा वेगळे ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर वैद्यकिय टीम लक्ष ठेवून आहे.
सरावाशिवाय श्रीलंकेचे खेळाडू उतरणार मैदानावर
इंग्लंड दौऱ्यावर तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांत श्रीलंकेला सपाटून मार खावा लागला. त्यानंतर घरच्या मैदानावर त्यांना टीम इंडियाचा सामना करायचा आहे. पण, आता ते ७ दिवसांच्या विलगिकरणात आहेत. खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी १२ जुलैला संपुष्टात येणार आहे आणि १३ जुलैला पहिला कसोटी खेळला जाणार आहे. ''लंडनहून परतल्यानंतर पहिले तीन दिवस सर्व सदस्य कठोर क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत. चौथ्या दिवसानंतर ते जिम आणि स्वीमींग पूलचा वापर करू शकतील. हॉटेलमध्ये ते सरावही करू शकतील. सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर ते मैदानावर सरावाला जाऊ शकतात,''असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अधिकाऱ्यानं सांगितले. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खेळाडूंची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक
वन डे मालिका - 13, 16 व 18 जुलै, कोलंबो
ट्वेंटी-20 मालिका - 21, 23 व 25 जुलै, कोलंबो