बेळगाव : लेगस्पिनर राहुल चाहरने घेतलेल्या एकूण ८ बळींच्या जोरावर भारत अ संघाने सोमवारी पहिल्या अनौपचारीक कसोटीत श्रीलंका अ संघावर एक डाव आणि २०५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
चाहरने अखेरच्या दिवशी भेदक मारा केला. त्याने पहिल्या डावात ७८ धावांत घेतलेल्या ४ बळींच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा पहिला डाव २३२ धावांत गुंडाळला. फॉलोआॅननंतर खेळणाऱ्या श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या १८५ धावांत संपुष्टात आला. दुसºया डावातही चाहरने ४५ धावांत ४ गडी बाद केले.
तत्पूर्वी, अभिमन्यू ईश्वरनच्या २३३, कर्णधार प्रियांक पांचालच्या १६० आणि अनमोलप्रीतसिंह याच्या नाबाद ११६ धावांच्या बळावर भारत अ संघाने रविवारी ५ बाद ६२२ धावा उभारताना पहिला डाव घोषित केला होता.
श्रीलंका अ संघाने दुसºया दिवसाचा खेळ संपला तेव्हा ४ बाद ८३ धावा केल्या होत्या. अशान प्रियरंजन आणि निरोशन डिकवेला यांनी तिसºया दिवशी प्रत्येकी २२ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. या दोघांनी १११ धावांची भागीदारी केली.
ही भागीदारी जयंत यादव (६७ धावांत २ बळी) याने प्रियरंजनला बाद करीत फोडली. प्रियरंजनने ४९ धावांची झुंजार खेळी केली. यष्टीरक्षक डिकवेलाने १०३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. (वृत्तसंस्था)
लंकेची घसरगुंडी
शतकवीर डिकवेला याला दुसºया बाजूने त्याला तोडीची साथ मिळाली नाही. त्यामुळे लंकेचा पूर्ण संघ ६३.४ षटकांत २३२ धावांत बाद झाला. पहिल्या डावात ३९० धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर श्रीलंका अ संघाचा दुसरा डावही ५२.३ षटकांत १८५ धावांत संपुष्टात आला. चाहरशिवाय संदीप वॉरियर व जयंत यांनीही प्रत्येकी ४ गडी बाद केले.