आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर ८ फेरीत भारतीय संघाला मोठा धक्का बसला. सातत्याने विजय मिळवत आगेकूच करणाऱ्या टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेने ७६ धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील भारताचा हा पहिलाच पराभव असून, टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात धावांच्या फरकाने झालेला हा भारताचा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.
या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करामने टी-२० विश्वचषकात कर्णधार म्हणून १३वा विजय नोंदवला. त्यामुळे त्याने या स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माला मागे टाकले. रोहित शर्माने १४ सामन्यांत १२ विजय मिळवले आहेत, तर मार्करामने १४ सामन्यांत १३ विजयांची नोंद केली आहे. टी-२० विश्वचषकात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत एमएस धोनी २१ विजयांसह अव्वल स्थानावर आहेत. त्यांच्या पाठोपाठ केन विल्यमसन (१४ विजय), एडेन मार्कराम (१३ विजय), रोहित शर्मा (१२ विजय), डॅरेन सॅमी (१२ विजय) आणि दासुन शनाका (१२ विजय) यांचा समावेश आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेने निर्धारित २० षटकांत ७ बाद १८७ धावा केल्या. डेव्हिड मिलरने ३५ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६३ धावांची आक्रमक खेळी साकारली. डेवाल्ड ब्रेव्हिसने २९ चेंडूत ४५ धावा करत चांगली साथ दिली, तर ट्रिस्टन स्टब्स ४४ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले.
१८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. सुरुवातीलाच ५१ धावांत ५ फलंदाज बाद झाल्याने सामना हातातून निसटला. शिवम दुबेने ४२ धावांची लढत दिली; मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. भारतीय संघ १८.५ षटकांत १११ धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जानसेनने भेदक गोलंदाजी करत ४ विकेट्स घेत भारतीय फलंदाजीची कंबर मोडली. विशेष म्हणजे, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही भारतीय संघाला याच मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे अहमदाबादच्या मैदानावरील हा आणखी एक पराभव भारतीय चाहत्यांसाठी वेदनादायक ठरला आहे.
Web Summary : South Africa defeated India in the T20 World Cup. Markram surpassed Rohit Sharma with 13 wins as captain. India lost by 76 runs after South Africa scored 187. India was all out for 111, with Jansen taking 4 wickets.
Web Summary : टी20 विश्व कप में दक्षिण अफ्रीका ने भारत को हराया। मार्कराम 13 जीत के साथ रोहित शर्मा से आगे निकले। दक्षिण अफ्रीका ने 187 रन बनाए, जिसके जवाब में भारत 111 पर ऑल आउट हो गया। जेनसन ने 4 विकेट लिए।